नवीन वाहतूक नियम लागू झाल्यापासून अनेकांनी या नियमांची धास्ती घेतली आहे. अनेक ठिकाणी लाखोंचा दंड करण्यात आल्यानंतर कागदोपत्री पूर्तता असो किंवा पियुसी असो सर्व काही जवळ ठेऊनच अनेकजण गाड्या चालवताना दिसत आहेत. असे असतानाच दिल्लीतील टॅक्सीचालक मात्र एका अंधश्रद्धेमुळे फर्स्ट एड बॉक्समध्ये चक्क कंडोम ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली आणि एनसीआर परिसरातील अनेक टॅक्सी चालक आपल्या टॅक्सीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम आवर्जून ठेवतात. कंडोम ठेवला नाही तर वाहतूक पोलीस चलान कापतात असा त्यांचा समज आहे. यासंदर्भात बोलताना धर्मेंद्र नावाचा टॅक्सी चालक म्हणतो, ‘एकदा मला पोलिसांनी आडवले तेव्हा माझ्याकडील फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम नसल्याने मला दंड ठोठावण्यात आला.’ जरी त्याला देण्यात आलेल्या दंडाच्या पावतीवर वेगाने गाडी लावल्याचे नमूद करण्यात आले असले तरी आपण हळू गाडी चालवत असल्याचे सांगत कंडोम नसल्यानेच दंड केल्याचे धर्मेंद्र सांगतो. केवळ धर्मेंद्रच नाही तर अशाप्रकारे या भागातील अनेक टॅक्सी चालक अशाप्रकारे आपल्याकडी एर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवतात.

दिल्लीतील ओला उबर टॅक्सी चालकांची संघटना असणाऱ्या ‘सर्वोदय चालक संघटने’चे अध्यक्ष कमलजीत गील याबद्दल माहिती दिली. ‘लोकांना सेवा देणाऱ्या वाहनांमधील फर्स्ट एड बॉक्समध्ये कायम तीन कंडोम असले पाहिजेत असा नियम आहे,’ असं गील सांगतात. मात्र फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम का ठेवले पाहिजेत हे अनेक चालकांना ठाऊक नसते. ‘एखाद्याला अचानक रक्तस्त्राव सुरु झाला किंवा त्याचे हाड तुटले तर कंडोम वापरुन त्याच्यावर प्रथमोपचार करणे शक्य आहे. जखम झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात पोहचेपर्यंत जखम झालेल्या भागावर कंडोम बांधून ठेवता येतो,’ असं गील यांनी सांगितले. याशीवाय अगदीत आप्तकालीन परिस्थितीमध्ये काही द्रव्य वाहून नेण्यासाठी कंडोमचा वापर करता येतो असं सांगताना गील यांनी कंडोममध्ये तीन लिटर द्रव्य राहू शकते असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम नसेल आणि पोलिसांनी पकडले तर आपल्याला दंड केला जाऊ शकतो अशी बऱ्याच टॅक्सी चलकांची अंधश्रद्धा आहे. मात्र फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम हवा हे कोणत्या वाहतूक नियमांमध्ये लिहिले आहे? असा सवाल केल्यास त्याचे उत्तर कोणत्याच चालकाला देता येत नाही. ‘मी इतर चालकांकडून ऐकले आहे की फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळेच मी कायम एक कंडोम गाडीमध्ये ठेवतो. मला कधीही वाहतूक पोलिसांनी कंडोमसंदर्भात विचारलेले नाही. तरी वाहतूक शाखेमार्फत घेण्यात येणाऱ्या वार्षिक आरोग्य चाचणीमध्ये मला कंडोमबद्दल विचारले होते,’ असं रमेश पाल हा टॅक्सी चालक सांगतो. मात्र अशाप्रकारे आरोग्य चाचणीदरम्यान कोणत्याच चालकाला कंडोमसंदर्भात विचारले जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ‘वाहतूक केंद्राच्या बाहेर असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक चालकांना सुरक्षित लैंगिक जिवनासंदर्भात माहिती देत असतात. त्यामुळेच त्यांना फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्याची सवय लागली असेल,’ अशी प्रतिक्रिया एका वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली. ‘दिल्लीमध्ये कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने कोणत्याही टॅक्सी चालकाला कंडोम नसल्याने दंड केल्याचे एकही उदाहरण नाही. तरी कोणाला यासाठी दंड करण्यात आला असेल तर त्याने यासंदर्भातील तक्रार केल्यास आम्ही या प्रकरणात चौकशी करु,’ असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दिल्ली वाहन नियमन कायदा (१९९३) नुसार प्रत्येक टॅक्सी चलकाला त्याच्या गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्स ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये बॅण्डएड, हात आणि पायांना बांधता येतील अशा कापडी मोठ्या आकाराच्या बॅण्डएड, कापूस, आयोडीन, निर्जंतूकीकरण करणारे डेटॉलसारखे औषध आणि इतर महत्वाच्या अशा गोष्टी ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये कंडोमचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वाहतूक कायदा १९८९ मध्येही फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवण्यासंदर्भात कोणतीही सूचना करण्यात आलेली नाही.