INX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानेही तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. दरम्यान, चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (बुधवार) सकाळी सीबीआयची टीम पोहोचली मात्र, ते घरात उपलब्ध नसल्याने सीबीआयला रिकाम्या हाती परतावे लागले. Supreme Court Judge, Justice NV Ramana, sent the file of P Chidambaram’s plea seeking interim bail before Chief Justice of India Ranjan Gogoi to pass the order — ANI (@ANI) August 21, 2019 दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात स्पेशल लिव्ह पेटिशन (एसएलपी) दाखल केली होती. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाचे न्या. एन. व्ही. रामणा यांच्या कोर्टासमोर आज (बुधवार) ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी असा सल्ला चिदंबरम यांच्या वकीलांना दिला. मात्र, तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी अशी विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला केली मात्र, न्या. रामणा यांनी यालाही नकार दिला. यावेळी कोर्टात चिदंबरम यांच्यावतीने वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, सलमान खुर्शिद आणि विवेक तनखा हे बाजू मांडत आहेत. न्या. रामणा यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला असला तरी सध्या सरन्याायधीश रंजन गोगोई हे अयोध्या प्रकरणावर सुनावणीत व्यस्त आहेत. त्यामुळे ते चिदंबरम यांच्या याचिकेवर कधी निर्णय देतील हे अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे चिदंबरम यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारपासून चिदंबरम बेपत्ता असल्याने त्यांच्याविरोधात तपाय यंत्रणांनी लूकआऊट नोटीसही बजावली आहे. INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून भ्रष्टाचारप्रकरणी तर ईडीकडून आर्थिक घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. An extremely qualified and respected member of the Rajya Sabha, @PChidambaram_IN ji has served our nation with loyalty for decades including as Finance Minister & Home Minister. He unhesitatingly speaks truth to power and exposes the failures of this government, 1/2 — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 21, 2019 दरम्यान, काँग्रेसने चिदंबरम यांच्यावरील कारावाईबाबत भाजपावर निशाणा साधला आहे. "राज्यसभेचे खासदार असलेले पी. चिदंबरम हे अत्यंत हुशार आणि आदरणीय व्यक्तीमत्व असून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अनेक दशकांपासून देशाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी खरं बोलताना मोदी सरकारची पोलखोल सुरु केल्यानेच त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात आहे," असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला आहे.