‘देश प्रथम, नेहमीच प्रथम’ अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने ‘भारत जोडो’ आंदोलन उभे केले पाहिजे. महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता ‘भारत जोडो’आंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.

देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

खेळाडूंना उत्तेजन

जपानमधील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूचे नीतिधैर्य वाढवण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करावा, त्यासाठी व्हिक्टरी पंच कॅम्पेनमध्ये सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. तुम्ही भारतीय संघाविषयीच्या भावना त्यावर व्यक्त करून त्यांना उत्तेजन देऊ शकता.

कारगिलवीरांचे स्मरण

२६ जुलै हा कारगिल दिन असल्याची आठवण करून देत  त्यांनी सांगितले, की लोकांनी १९९९ मध्ये या युद्धात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहावी. मन की बात कार्यक्रमासाठी अनेक सूचना येत असतात, त्यातील प्रत्येकाचा समावेश करता येत नाही.

पण त्यातील काही चांगल्या सूचना आपण सरकारी विभागांकडे पाठवत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘माय गव्ह’ संकेतस्थळाने एक पाहणी केली असून त्यानुसार मन की बात कार्यक्रमासाठी सूचना पाठवणाऱ्यात ७५ टक्के  व्यक्ती पस्तीस वर्षांखालील असल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे चांगले लक्षण असल्याचे सांगून ते म्हणाले, की मन की बात हे सकारात्मकतेचे साधन आहे. मन की बात मध्ये सकारात्मक गोष्टींची चर्चा होते. त्याचे स्वरूप सामूहिक असेच आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रगीत संकेतस्थळ

देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी सांगितले, की सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रगीत एकत्र येऊन म्हणावे अशी योजना आखली आहे. यासाठी ‘राष्ट्रगान डॉट इन’ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवाजात राष्ट्रगीत गाऊन त्याचे ध्वनिमुद्रण त्यावर टाकू शकतात. या अभिनव उपक्रमाने देश येत्या काही दिवसात मजबूतपणे जोडला जाईल. असे अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.