आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ भारताला नौकानयन प्रकारात रौप्यपदक मिळवून देणाऱ्या श्वेता शेरवेगरचा सेंट इझाबेल्स हायस्कूल, माझगांव कडून सत्कार करण्यात आला. श्वेता ही सेंट इझाबेल्स हायस्कूलची माजी विद्यार्थीनी आहे. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मार्टा तसेच माध्यमिक विभागाच्या फर्नांडिस यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू श्वेताला भेट म्हणून देण्यात आल्या. या सत्काराला आजी माजी विद्यार्थीनी व शिक्षक उपस्थित होते.

जीवनात कोणतेही ध्येय साध्य करायचे असेल, तर प्रथम स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोपर्यंत ध्येयपूर्ती होत नाही, तोवर मागे हटू नका, असा मोलाचा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला.

श्वेताने शाळेबाबत आदराची भावना व्यक्त केली. ‘प्रत्येक व्यक्तीचा पाया हा शाळेतच घडत असतो. मी देखील अशीच घडले. मी शाळेत होते, तेव्हापासूनच मला खेळाची आवड होती. शालेय कारकिर्दीत माझी शाळेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. नंतर नौकायन प्रकारात कारकिर्द घडवताना माझे सहकारी, प्रशिक्षक, पालक यांच्याकडून मला जो पाठिंबा लाभला व सहकार्य लाभले, त्याबाबत मी साऱ्यांची ऋणी आहे’, असे ती म्हणाली.