स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ पेर थिओडोर क्लेव्ह यांनी हॉल्मियम आणि थुलीयम या दोन मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १८४० रोजी स्टॉकहोम येथे झाला. प्रख्यात उप्साला विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाच वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ते विद्यापीठात धातुशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक झाले व नंतर रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक आणि मग रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते विद्यापीठात कार्यरत होते.

आपल्या संशोधनाची सुरुवात पेर क्लेव्ह यांनी अमोनिया आणि क्रोमिअम यांच्या संयुगांपासून केली. जटिल रासायनिक संयुगांवर त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. प्लॅटिनमच्या संयुगांचे संश्लेषणही त्यांनी केले. १८८५ साली वेल्सबॅक यांनी  शोधलेल्या प्रेसोडिअम आणि निओडायमिअम या दोन मूलद्रव्यांच्या अस्तित्वाची शक्यता पेर क्लेव्ह यांनी अकरा वष्रे आधीच मांडली होती. इतकेच नव्हे तर नव्याने शोध लागलेले स्कँडियम म्हणजेच मेंडेलिव्ह यांनी भाकीत केलेले इका बोरान हेही क्लेव्ह यांनी दाखवून दिले, आणि स्कँडिअमचा अणुभारही निर्धारित केला.

आपल्या संशोधनादरम्यान क्लेव्ह यांना नॉर्वेत सापडणाऱ्या युरेनिअमच्या खनिजात हिलिअम हे मूलद्रव्य सापडले. हिलिअमचा पृथ्वीवर सापडलेला हा पहिलाच स्रोत. युरेनिअमच्या या खनिजांना क्लेव्हाइट असेही म्हटले जाते. डायक्लोरो नॅफथिलीन(Dichloro naphthalene) या संयुगांची सहा रूपे आणि अमायनो नॅफथिलीन सलफोनिक आम्लांचा शोध हे पेर क्लेव्ह यांचे सेंद्रिय रसायनशास्त्राला दिलेले महत्त्वाचे योगदान आहे.

१८९० पासून पेर क्लेव्ह यांनी आपले लक्ष जीवशास्त्र आणि समुद्रविज्ञान यांच्या अभ्यासावर केंद्रित केले. गोडय़ा पाण्यातील शैवाल आणि प्लावक (plankton) यांच्या वरील संशोधनादरम्यान प्लावकांच्या अनेक प्रजातींचा शोध त्यांनी लावला. तसेच हिमनदीच्या स्तरात सापडणाऱ्या जीवाश्मांवरून स्तराचे वय ठरविण्याची नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली. समुद्रात असणाऱ्या प्रवाहांत वेगवेगळे प्लावक असतात. प्रवाहात असणाऱ्या या प्लावकांच्या अस्तित्वावरून प्रवाहाचा उगम कुठे झाला हे ठरवता येते असे गृहीतक त्यांनी मांडले. यावरचे त्यांचे पुस्तक समुद्रविज्ञानशास्त्राचे प्रमाणभूत म्हणून समजले जाते.

पेर क्लेव्ह स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-शिक्षणाचे समर्थक होते. त्यांची विद्याíथनी एलेन फ्राईज ही डॉक्टरेटची पदवी मिळवणारी स्वीडन मधली पहिली महिला होय.

– डॉ. सुलभा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org