ग्राहकांच्या प्रतिसादावर नव्या व्यासपीठाचे भवितव्य

मुंबई : दसरा-दिवाळीच्या तोंडावर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादकांना वा विक्रेत्यांना एकाच छताखाली बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या ग्राहक पेठा, प्रदर्शने ही आता ऑनलाइन भरू लागली आहेत. अर्थात प्रदर्शने, पेठांचे या नव्या व्यासपीठावरील भवितव्य ग्राहकांच्या  प्रतिसादावर अवलंबून असेल.

शहरात अनेक ठिकाणी भरणाऱ्या ग्राहक, व्यापारी पेठा, अन्य राज्यांची प्रदर्शने-विक्री यांमध्ये अनेकांना रोजगार मिळतो. करोनामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शने आयोजित करण्याला मर्यादा आली असली तरी मुंबई, ठाण्यातील प्रदर्शन आयोजकांनी ऑनलाइन प्रदर्शने घेण्यास सुरुवात केली आहे.समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करत ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या विलेपार्ले शाखेतील गौरी टिकले यांनी टाळेबंदीत विक्रीचा अभिनव प्रयोग राबवला. करोनात लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची यादी केली आणि त्यांचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची माहिती घेत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवले. या गटामार्फत गणेशोत्सवात मोदक, मखर, सजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य यांची विक्री के ली. यामुळे घरबसल्या अनेक महिलांना रोजगार मिळाला. ज्यांची नोकरी गेली, त्यांनाही आधार मिळाल्याचे त्या सांगतात. करोनामुळे सध्या ग्राहक खाद्यपदार्थ, मुखपट्टय़ा, हातमोजे, सॅनिटायझर आदी जीवनावश्यक वस्तूंचीच खरेदी करत आहेत. शोभेच्या वस्तू, दागिने, सौंदर्यप्रसाधने, बॅग यांना कमी प्रतिसाद असल्याचे टिकले यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्यापारी पेठतर्फे दरवर्षी गणपती आणि दिवाळीमध्ये दादर येथील अँटोनी डिसिल्व्हा स्कूल येथे प्रदर्शन भरते. शिथिलीकरणानंतर त्यांनी मुंबई महापालिकेकडे प्रदर्शन भरविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, डिसेंबपर्यंत सार्वजनिक प्रदर्शनास मनाई केल्याने आम्ही ऑनलाइन प्रदर्शन भरवण्याच्या विचारात असल्याचे व्यापारी पेठेचे कार्यकारी सचिव विजय कामेरकर यांनी सांगितले. तर, ‘ऑनलाइन प्रदर्शन आयोजित केले तरीही त्यात आर्थिक गणिते जुळणे आवश्यक आहे. करोनाच्या धास्तीपायी ग्राहक ऑनलाइन प्रदर्शनाकडे वळतील का,’ अशी शंका डोंबिवलीतील आगरी महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे यांनी व्यक्त के ली. ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’तर्फे  लवकरच ‘नमस्ते भारत’ हे प्रदर्शन ऑनलाइन आयोजित केले जाणार आहे. आयुर्वेद, शेती उत्पादने, हातमाग, कलाकुसरीच्या वस्तू, बॅग्ज, महिलांसाठी कपडे, पाकीटबंद खाद्यपदार्थ यांचा समावेश असलेले हे प्रदर्शन २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या प्रदर्शनात महिलांना चित्रफिती तसेच छायाचित्रे याच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात करता येईल. यात उद्योजकांनी वस्तूंचे तपशील, संपर्क क्रमांक भरायचे आहेत. एका खासगी कुरिअर कंपनीच्या सहकार्याने ग्राहकांना वस्तू घरपोच मिळतील, अशी माहिती आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मीनल मोहाडीकर यांनी दिली.

ऑनलाइन व्यवसायात नेटवर्कच्या अडचणी

मोखाडा येथे राहणारे राजू नवरे हे रानभाज्या, वारली चित्रे, बांबूपासून बॅग, चपला, शोभेच्या वस्तू तयार करतात. अनेकदा शहरात भरणाऱ्या प्रदर्शनात ते या वस्तू विक्रीला ठेवतात. त्यांचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायावरच अवलंबून आहे. आधी या वस्तूंच्या विक्रीतून दहा हजार रुपयांची कमाई व्हायची. आता महिन्यातून एखादी वस्तू विकली जाते. इयत्ता सातवी शिकलेल्या राजूंना ऑनलाइन व्यवसाय कसा करायचा हे माहीत नाही. इथे गावात वीज खंडित होणे, मोबाइलचे नेटवर्क नसणे यामुळे ग्राहकांशी संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याचे ते सांगतात.