पालिकेच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व विभागात खास साहित्य कला उपक्रमांसाठी विशेष उद्यान विकसित करण्यात आले असून, जानेवारीच्या अखेरच्या आठवडय़ात त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.
हुतात्मा चौकातील एका पडीक बगिच्यात हे उद्यान साकारण्यात आले असून त्याला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे नाव देण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये राहणारे कवी-लेखक किरण येले यांच्या संकल्पनेतून हे उद्यान तयार होत आहे. त्यात ठिकठिकाणी मराठी साहित्यातील निवडक वेचे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या लेखकांचा परिचय आहे. या उद्यानामध्ये नियमितपणे साहित्य कट्टा भरविला जाईल. शहरातील विविध संस्थांना साहित्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हा कट्टा विनामूल्य उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरता यावे म्हणून येथे हिरवाई जोपासण्यात आली आहे. विशेष म्हणजे उद्यानाच्या कठडय़ांचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्या जागेचा वापर विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली.