राज्यात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू न करता काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. याविषयी बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे. “मलाही कळतंय की गेल्या अनेक महिन्यांपासून सगळ्यांनाच करोनामुळे त्रास होतोय. त्यामुळे काहींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पण करोनाची साखळी तोडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांनीच एकमेकांना कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता सहकार्य करायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता काम करायला हवं”, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!

लोकांमध्ये भिती कमी!

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचं देखील आवाहन केलं आहे. “पहिल्या लाटेपेक्षा आता कितीतरी जास्त सुविधा आपल्याकडे झाल्या आहेत. तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं की त्याचं गांभीर्य किती आहे. सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर आख्ख्या देशानं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, पहिल्या लाटेमध्ये लोकांमध्ये करोनाची भिती होती. करोना झाला हे सांगायला देखील लोकं घाबरत होती. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. जर एखाज्याला करोना झाला आणि तो सगळ्यांच्या सहवासात आला, तर तो इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित करत नव्हता. पण आता हे बाधित होण्याचं प्रमाण वाढलं आहे”, असं ते म्हणाले.

जावडेकर म्हणाले, ‘मागणीनुसार लसीचे डोस मिळतील!’

पुण्यात काही ठिकाणी लसींचा पुरवठा कमी पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी प्रकाश जावडेकरांनी लसींचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं. “पुण्यात ५५० लसीकरण केंद्र आहेत. सर्व केंद्रात वेगवेगळ्या प्रमाणात लसीचे डोस असतात. ग्रामीण भाग देखील मोठ्या प्रमाणावर आहे. पण प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की तुमच्या मागणीनुसार लसींचे डोस पुरवले जातील. जसं सुरुवातीच्या काळात अकोला आणि अमरावतीमध्ये दुसरी लाट आली होती. ती आता बऱ्याच अंशी खाली आली आहे. आपल्याकडे देखील तशाच पद्धतीने नियंत्रण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.