बातमीचा मथळा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल? पोलिसांनी दोन क्विंटल जिलेबी आणि १०५० सामोसे का जप्त केले असतील, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. हे सगळं जप्त करण्यामागचं कारण आहे निवडणूक! हो… निवडणूकच. आणि ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दहा जणांना अटकही केलं आहे.

सध्या महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सध्या करोनाचा उद्रेक झालेला आहे. उत्तर प्रदेशातही करोना वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारून दिसत आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही उत्तर प्रदेशात होत आहे. तर जिलेबी आणि सामोसे जप्त करण्याला या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

पंचायती समिती निवडणूक लढवणाऱ्या हसनगंज येथील एका उमेदवारांने मतदारांना वाटप करण्यासाठी चक्क जिलेबी आणि सामोसे यांचा बेत आखला होता. तशी तयारीही करण्यात आली. आचारी आले, कामाला लागले. जिलेबी आणि सामोसे तयार करण्याचं काम सुरू असतानाच उन्नाव पोलिसांनी घटनास्थळी पाऊल ठेवलं.

सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी तयार करण्यात आलेली २ क्विंटल जिलेबी आणि १०५० सामोसे जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल केला. कोविड नियमावलीचा आणि निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच याची माहिती दिली.