डहाणूजवळील तलासरी येथील तहसीलदार गणेश सांगळे यांच्याकरिता दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या डॉ. मनोहर कांबळे याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून रविवारी अटक केली.
तलासरी तालुक्यातील मौजे उधवा येथील ४६ गुंठे जमिनीबाबतचे काम तक्रारदारच्या बाजूने करण्यासाठी डॉ. मनोहर कांबळे याने पालघरचे जिल्हाधिकारी, डहाणूचे उपविभागीय अधिकारी व तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे यांच्याकरिता तक्रारदाराकडे ६ लाख रुपयांची लाच मागितली होती. यामधील ३ लाख रुपये
तहसीलदार सांगळे यांच्यासाठी मागितले होते व त्यापैकी चाळीस हजार रुपये तक्रारदाराने कांबळे याच्याकडे १५ डिसेंबरलाच सुपूर्द केले होते.
याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार मिळल्यावर त्यांनी याबाबत योजना आखली. त्यानुसार रविवारी सापळा रचून कांबळे याला लाच घेताना तलासरी येथे रंगेहाथ अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.