नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत आरोग्य सेवेचे वाभाडे

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत आरोग्य विभागाच्या कारभारावर टीकेचा भडिमार झाला. रक्तपेढीतील अनेक उपकरणे बिघडली आहेत, पॅथॉलॉजीची सुविधा खासगी प्रयोगशाळांपेक्षा महागडी आहे, असे ताशेरे सदस्यांनी ओढले.

आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचे आणि उपकरणांच्या खरेदीचे प्रस्ताव वारंवार आणले जातात, मात्र प्रत्यक्ष सेवा देण्याकडे, योजना-निर्णयांच्या काटेकोर अंमलबाजवणी, पाठपुराव्याकडे आरोग्य विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, असा आक्षेप स्थायी समिती सदस्यांनी घेतला. वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णांना आहार पुरवठा, तसेच रुग्णालयात पॅथॉलॉजी साहित्य खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, यावेळी नगरसेवकांनी इतर सुविधांचा अभाव असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक देवीदास हांडेपाटील यांनी वाशीतील उपलब्ध सेवेवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी सांगितले की, गेले चार ते पाच वर्षे वाशी रुग्णालयातील रक्तपेढीतील फ्रिजर वारंवार बंद पडत आहेत. रक्तपेढीत ३ हजार पिशव्या रक्तसाठा होतो. फ्रिजर बंद पडत असल्यामुळे रक्ताचा दर्जा कायम ठेवण्यात अडचणी येत आहेत. वाशीतील रुग्णालयात बाहेरील पॅथॉलॉजी उपलब्ध आहे, मात्र तिथे बाजारभावापेक्षा ५० टक्के जादा दराने आकारणी करत आहेत. रक्तातील प्लाज्मा साठविण्यासाठी सुविधा नाही, अशी टीका हांडेपाटील यांनी केली.

नगरसेविका भारती पाटील यांनी सांगितले की, माताबाल रुग्णालयात पुरेशा सेवा उपलब्ध नाहीत. नवजात बालकांसाठी काचेची पेटी (इन्क्युबेटर) उपलब्ध नाही, मग अशा वेळी ऐनवेळेस प्रसूती झालेल्या महिलेला खासगी रुग्णालयात जावे लागते, अशी तक्रार त्यांनी मांडली. महिन्याभरात इतर सेवा उपलब्ध करून देण्यात येतील असे मत अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व सदस्यांच्या मागणीनुसार स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी येत्या २५ तारखेला आयुक्तांसमवेत स्थायी समितीचे सर्व सदस्य प्रत्येक रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य सेवेत भासणाऱ्या कमतरतेची माहिती देतील, असे सांगितले.

कृत्रिम श्वसन सुविधेची कमतरता

रुग्णालयात कृत्रिम श्वसन सुविधा नाही, असे नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितले. वाशीमध्ये १० पैकी ४ व्हेंटिलेटर उपयोगात आहेत तर ऐरोली, नेरुळ रुग्णालयांतील यंत्रणा बंदच आहे. पालिका प्रशासन रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवत आहे, असेही त्यांनी सांगितले.