|| पंकज भोसले
गेला आठवडाभर भारतातील समाजमाध्यमांपासून ते आंतरजालीय व्यवहारांत राज कुंद्राकृत कथित कामपटांचे आदान-प्रदान सर्वाधिक वेगाने होत आहे. अमेरिका-ब्रिटन या प्रगत देशांनंतर पोर्नग्रहण या बाबीत भारत तिसऱ्या क्रमांकावरचे राष्ट्र असले, तरी विचार-आचार आणि आर्थिक पातळीवर आपण मागासांचे महाराज आहोत. कारण देशातील न्याययंत्रणेच्या कक्षेत कोणत्याही प्रकारचे पोर्न पाहणे गुन्हा नाही, मात्र देशीवादाचा आग्रह धरत ते बनविल्याबद्दल तुरुंगवास घडू शकतो…

आफ्रिकेतील आर्थिकदृष्ट्या मागास राष्ट्रे, कट्टर धार्मिक असलेले पश्चिम आशियाई देश आणि लोकशाहीचा अंशही नसलेल्या आशियातील बऱ्याचशा टापूत पोर्नबंदी आहे. लोकशाही असलेला भारत कागदावर या पोर्नविरोधी राष्ट्रांच्या पंगतीत असलेला एक. मात्र कामसूत्रकार वात्स्यायनाची कर्मभूमी असलेल्या येथील जनमनांत पोर्नभक्तीचा मळा बारमाही फुललेला असतो. त्यामुळेच पोर्ननजरी अहवालांनुसार भारतीयांचे आंतरजालावरील नयनसुख पर्यटन हे अमेरिका, ब्रिटननंतर सर्वाधिक भरते.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

बरे, हे अलीकडचे छंदो-व्यसन म्हणावे, तर तसेही नाही. ऐंशीच्या दशकात जपानमध्ये होम व्हिडीओ आणि सोनी बीटामॅक्स तंत्रज्ञान आले. कॅमकॉर्डरच्या साहाय्याने व्हीएचएसवर (व्हिडीओ कॅसेट) काहीही सहजपणे चित्रित करता येऊ लागले. त्यानंतर पोर्न सिनेमांचा देशोदेशी सुळसुळाट झाला हा एक गैरसमज आहे. त्याआधीच, १९६० साली अमेरिकेच्या पश्चिम भागात २० अ‍ॅडल्ट थिएटर उभारली गेली होती. हॉलीवूडला समांतर अशी ही निर्मिती होती. तेव्हापासून पोर्नउद्योगाला आरंभ झाला, असा पाश्चिमात्य अभ्यासकांचा दावा आहे. मात्र पुराण अभ्यासकांच्या मते, शब्दांत रचले गेलेले हजारो वर्षांपूर्वीचे संस्कृत शृंगार साहित्य अरबांद्वारे युरोपादी राष्ट्रांत प्रसारित झाले आणि तेथून ‘रिबाल्ड’ म्हणजेच चावट साहित्य म्हणून जगभरात पसरले. हे खरे आद्यपोर्न. (केवळ मराठमोळ्या संस्कृतीबद्दल बोलायचे, तर लावणी ते भावगीत-गझलांतील शृंगाररसपूर्ण पंक्ती अर्थ न जाणताच सर्वांच्या तोंडी सातत्याने गुणगुणल्या जातात, त्यालाही शाब्दिक पोर्न म्हणावे लागेल. कारण अर्थ लक्षात घेतला तर भावना उद्दीपनाच्या निकषांत ते सहज बसेल!)

आठवडाआरंभी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पतीराज राज कुंद्रा यास २०१९ सालातील तक्रारीवरून आणि पोलिसांकडून फेब्रुवारी २०२१ मधील पोर्न रॅकेट उद््ध्वस्त करण्यात आल्यानंतर सापडलेल्या धाग्यादोऱ्यांतून अटक करण्यात आली. आपल्या लंडनस्थित नातेवाईकाद्वारे ‘हॉटशॉट्स’नामक अ‍ॅप तयार करून राज कुंद्रा भारतीय नग्नाविष्काराच्या कामकृती बनवत इंटरनेटद्वारे त्याचा प्रसार आणि विक्री करीत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांकडे पुरावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात तरुणीने दाखल केलेली फिर्यादही आहे. ज्यानुसार कुंद्रा आणि त्याची पोर्ननिर्माती टोळी ‘ओटीटी’वरील मालिकांमध्ये काम दिल्याचे सांगत अश्लील उद्योगात रममाण असल्याचे म्हटले आहे. ही टोळी आणि तिचा म्होरक्या कुंद्रा याद्वारे बक्कळ पैसा उभारत असल्याचा तपशीलही उपलब्ध झाला आहे.

यातल्या माहितीमधील गंमत म्हणजे, बहुतांश भारतीय आणि त्यातूनही पोर्नदर्शक असलेल्या जगाला कुंद्रा याचा पोर्नोद्योग गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या अटक कारवाईनंतर विस्तारित स्वरूपात माहीत झाला. त्यानंतर टेलिग्राम साधक तसेच व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर समाजमाध्यमांमधील दर्दींकडून त्याने तयार केलेल्या ‘कलाकृती’ अगदी मोफत फिरू लागल्या. कुंद्राला याप्रकरणी अटक झाल्याचे समजताच विनोद, मिम्स आणि हास्यरसाच्या विविध आवृत्त्याही समाजमाध्यमांत घुमण्यास सुरुवात झाली. ‘अल्ट बालाजी’ या माध्यमातील उत्तानरसपूर्ण आणि मादकचतुराईयुक्त मालिका पाहून उद्दीपनांचा स्वर्ग गाठणाऱ्या आणि केवळ अमेरिकी-ब्रिटिशच नाही, तर त्रिखंडांतील पोर्नस्टार्सच्या अंगविशेषांची कळास्मरणे इंटरनेटमुळे सहसप्राप्य झालेल्या देशातील पोर्नप्रेमी कुंद्राकृत्यातून तयार झालेला स्वदेशी साठा पाहण्यासाठी घायकुतीला आले. या कुंद्राने म्हणे ‘हॉटशॉट्स’प्रमाणे हॉटहिट, न्यूफ्लिक्स आदी अ‍ॅपही तयार केले होते. याशिवाय पायरसीद्वारे मोफत सारे पाहण्याचे सोकावलेल्या भारतीयांपासून आपल्या उत्पादनांची चोरी होऊ नये म्हणून त्याने आणखी एक संरक्षित अ‍ॅपही बनवले होते. त्या संरक्षित कडा भेदून त्याच्या पोर्नफिल्म्स कवडीमोल बनून सध्या भारतीय तरुणांचा अवलोकनाचा मुद्दा बनला आहे. त्याने तयार केलेल्या पोर्नसिनेमांचा अभ्यास झाल्याशिवाय त्याच्यावर टीका होऊ नये, असे सुजाण नागरिकांचे विनोद गेल्या दोन दिवसांत माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरांवर गेले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या घरात घालण्यात आलेल्या धाडीत ७० पोर्नफिल्म्स इतका मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. हा कुंद्राकृत की परदेशी पोर्नकर्त्यांनी निर्मिलेला, याचा पडताळा पोलिसांच्या अवलोकनानंतरच होऊ शकेल. पण दोन हजारोत्तर काळातील शहर-गावातील तरुणांच्या, मध्यमवयीन व्यक्तींच्या स्मार्टफोन्स, पीसी, लॅपटॉप, एक्स्टर्नल हार्डडिस्कमध्ये किंवा हब्स आणि व्हिडीओ शेर्अंरग टोरंट्स संस्थळांवर उपलब्ध असलेल्या साठ्याची गणती करायला कायदेशीर यंत्रणेस बसवले, तर कित्येक महिने लागतील. त्याचबरोबर खासगीरीत्या पोर्न पाहणाऱ्यांनी तुरुंग दुथडी भरून वाहू लागतील.

भारतीय कायद्यात ‘पोर्न’ या शब्दाची व्याख्याच करण्यात आलेली नाही. कुंद्राला पोर्नोग्राफी निर्माण करण्याबाबत अटक करण्यात आली आहे. इतर कारणांमध्ये फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग आदींची कलमे लावण्यात आली आहेत. ग्रीकांनी प्राचीन काळी ‘पोर्नोग्राफी’ हा शब्द तयार केला. तो ‘पोर्नो’ म्हणजे वारांगना आणि ‘ग्राफोस’ म्हणजे वर्णन यांतून निर्माण झाला. मध्ययुगात तो वेगवेगळ्या अर्थांनी वापरला गेला. सिनेमाध्यमाच्या निर्मितीनंतर त्याची व्याप्ती बदलली. इंटरनेट युगात त्याचे रूप आणखी पालटले. भारतीय दंडसंहितेत अश्लीलतेची मात्र व्याख्या झाली आहे. कामोत्तेजक, मनखेचक, लैंगिकरस ओतप्रोत भरलेली, कुमार्गी नेणारी अशी गोष्ट पाहणे, वाचणे अथवा ऐकणे कायद्याने निषिद्ध आहे. आता इतके सगळे असूनही पोर्न पाहू नका असे कायदा किंवा न्यायालयही म्हणत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, बंद खोलीत किंवा खासगी ठिकाणी लोक हवा तितका वेळ हवे त्या प्रकारचे पोर्न पाहू शकतात. परंतु पोर्न बाळगणे, त्याचा साठा करणे, वितरण किंवा आदान-प्रदान करणे मात्र गुन्हा आहे. (मग बंद खोलीत ते कसे पाहावे याबाबत निर्देश न देताही लोकांनी आपापले मार्ग शोधून काढलेत!) एका न्यायालयीन लढाईनंतर सरकारी आदेशानुसार भारतातील इंटरनेट पुरवठादारांना सेवा देताना ८२७ पोर्नसाइट्सवर बंदी घालण्याची आकडेवारी होती. मात्र, या साइट्स कशा उघडायच्या, व्हीपीएन कसा वापरायचा याचे ज्ञान जगातील १३ ते १९ वयोगटातील मुलांना असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालही आता जुने झाले आहेत. भारतात इंटरनेट दुर्गम भागात वेगाने कार्यरत झाल्यानंतर आणि मोफत वायफाय सुविधा तेथे थेट पोहोचल्यानंतर नेत्रसुख पर्यटनाचा आबालवृद्धी उद्योग अहोरात्र सुरू आहे. हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांना पोर्न जबाबदार असल्याचे उच्चरवात सांगितले जात आहे. पण पोर्नपूर्व काळात हिंसा आणि बलात्कार होतच नव्हते, अशी आकडेवारी कुणास सादर करता येत नाही.

भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील म्हणजेच इंटरनेटवरील पोर्ननिर्मिती ही निषिद्ध आहे. पण हे दाखवणाऱ्या बहुतांश संकेतस्थळांचे सव्र्हर्स भारतात नसल्यामुळे ते भारतीय कायद्यांच्या कक्षेत येत नाहीत, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. उदाहरणार्थ, बहुतांश आंतरराष्ट्रीय पोर्न संकेतस्थळांवर गेल्या दहा वर्षांत भारतीय पोर्न ही नवी शाखा तयार झालेली दिसते. त्यातील दृक्मुद्रणे पाहिली, तर छुपे चित्रीकरण, स्मार्ट फोन आल्यानंतर संगनमताने जोडप्यांनी स्वत:हून तयार केलेली दृक्मुद्रणे, हॅकर्स किंवा चुकीच्या हाती पडून प्रसारित झालेल्या क्लिप्सचा अधिक भरणा त्यात पाहायला मिळतो. हे सारे काम उद्दीपनाऐवजी भयकारीच अधिक वाटू शकेल अन् त्यांच्याबाबत तक्रारी फारशा होत नाहीत किंवा त्या कुणी प्रसारित केल्यात यावरून कारवाईही होऊ शकत नाही.

भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६७ (ब) या कलमानुसार लहान मुलांना अश्लील दृक्मुद्रणांमध्ये वापरणे हा मोठा गुन्हा आहे. कलम ६६ (इ) नुसार कोणत्याही व्यक्तीच्या खासगी अवयवाचे तिच्या संमतीशिवाय चित्रीकरण आणि प्रकाशन गुुन्हा आहे. त्याबाबतची दृक्मुद्रणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे हाही गुन्हा आहे. हा भाग अश्लीलतेच्या कलमात मोडतो. पोर्नोग्राफीच्या नाही.

मग कुंद्राने काय केले (त्याच्यावरील आरोप भारतीय कायद्याच्या कक्षेत सिद्ध झाल्यास), तर अश्लीलतेच्या कायद्यानुसार प्रौढवयीन स्त्री-पुरुषांचा कामव्यवहार… जो तंतोतंत समाजातील घराघरांत आदिम काळापासून घडत आहे, त्याचपासून पुनरुत्पादनाची क्रियाही शेकडो वर्षे चालत आली आहे… त्याची दृक्मुद्रणे त्यातील कलाकारांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून विक्रीस ठेवली. त्यासाठी परदेशातून खासगी अ‍ॅप बनवले. बहुधा विदेशी सव्र्हर्सवरूनच त्या दृक्मुद्रणाची विक्री केली. कामदर्शनाची तीव्र उबळ असणाऱ्या आणि त्यांवर पैसा ओतायची तयारी असणाऱ्या जगभरातील गुलछबूंनी ते खरेदी केले. बाजारात ज्या गोष्टीची मागणी आहे, त्याचा कुंद्राने उद्योग उभारून पुरवठा केला. यात त्याचे काय चुकले, हा खरे तर मोठा प्रश्न आहे. कारण गुप्तपणे सुरू असलेला उद्योग कुणा टिनपाट कलाकाराने आपल्याला योग्य मोबदला न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर उघड झाला. कुंद्राच्या पत्नीचे तारांकित वलय या गोष्टीत माध्यमांना खाद्य पुरवणारे ठरले. त्यातून दररोज तयार होणारा वृत्तघाणा हा नवनव्या विनोदनिर्मितीस जबाबदार ठरला. चार दिवस पाऊस नसता पडला, तर या वृत्तवाहिन्यांचा घोडा सैरावैरा कथांचा निर्मिक झाला असता.

आता साऱ्यांचे लक्ष कुंद्राचे काय होते, याकडे आहे. ही चित्रनिर्मिती करणारा ‘तो मी नव्हेच’ हा पवित्रा त्याने घेतला असून आपल्या कायद्यातील कलमांना छेद देणारे कोणते युक्तिवाद त्याच्या बाजूने सादर होतात, हे पाहणे गमतीशीर ठरेल. कारण कुंद्रा यातून सुटला काय किंवा या प्रकरणात सखोल अडकला काय, तरी तो भारताचा लॅरी फ्लिण्ट होणार नाही किंवा ह्यू हेफ्नरदेखील बनणार नाही. पण बाजाराची अश्लील दृक्मुद्रणांची मागणी कायम राहील अन् त्या मागणीचा पुरवठा करणारे कित्येक कुंद्रा तयार होणे थांबणार नाहीत. उलट, अतिदक्षपणे कायद्याच्या अपुऱ्या व्याख्येच्या आड व्यसन लावणारा हा नयनसुख पर्यटनाचा उद्योग जोमात सुरू राहील.

 

आपण मागास का झालो?

शृंगाराची शतकानुशतकांची समृद्ध परंपरा असलेल्या भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर व्हिक्टोरिअन सोवळ्यांचे अवडंबर माजले, त्यातून आपला शृंगारठेवा नष्ट झाला आणि आपल्याच ज्ञानाला आपण पारखे होण्याची स्थिती निर्माण झाली. लैंगिक व्यवहारांचे निकोप शिक्षण नसलेल्या समाजात आज प्रकृतीची सीमा विकृतीला जाऊन पोहोचली आहे.

सामूहिक विस्मरणात गेलेल्या नोंदी…

लोणावळ्यात २००८ मध्ये एका खासगी बंगल्यातील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांची धाड पडली. पोलिसांनी पोर्न सिनेमा पाहात असलेल्या अनेकांना अटक केली. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतच्या खटल्यात वकिलांच्या युक्तिवादानंतर ‘खासगी ठिकाणी पोर्न सिनेमा पाहणे गुन्हा नाही’ हा निकाल दिला.

अभिनेत्री मोना सिंग हिच्या अश्लील एमएमएसवरून २०१३ साली वादंग उठले. ते दृक्मुद्रण चेहरा बदलून (मॉर्फिंगद्वारे) केल्याचे मोना सिंगने सांगितल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यात बदल झाले. ते दृक्मुद्रण असलेल्या संकेतस्थळावर कारवाई झाली.

मीरा नायर दिग्दर्शित ‘कामसूत्र’ हा चित्रपट १९९६ साली भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यास सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली नाही. मात्र, अवैध मार्गाने २००० सालानंतर तो सहज उपलब्ध होऊ लागला.

 

pankaj.bhosale@expressindia.com