सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीच्या हाताखाली कारभार चालवल्यानंतर, बीसीसीआयला पहिल्यांदा नवीन अध्यक्ष मिळणार आहे. लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार बीसीसीआयच्या कारभारात मोठे बदल करण्यात आले आहेत. २३ ऑक्टोबरला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र आपल्या हाती घेणार आहे. २३ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी सौरव गांगुलीचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्याची निवड निश्चीत मानली जात आहे. आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याआधी गांगुलीने धोनीच्या निवृत्तीबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

“निवड समिती धोनीबद्दल काय विचार करते हे मला जाणून घ्यायचं आहे, २४ तारखेला मी त्यांच्याशी भेटणार आहे. यानंतर मी माझं मत मांडेन. धोनीला नेमकं काय अपेक्षित आहे हे देखील आपल्याला पहावं लागणार आहे. यासंदर्भात मी त्याच्याशीही चर्चा करणार आहे.” इडन गार्डन्स मैदानाबाहेर सौरव गांगुली पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – मलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो – धोनी

“धोनीबद्दल आतापर्यंत अंतर्गत काय घडामोडी घडल्या याबद्दल मला माहिती नाहीये. आता मी या गोष्टीत लक्ष घालू शकेन”, गांगुलीने आपलं मत मांडलं. २४ तारखेला बांगलादेशच्या आगामी भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा होणार आहे. याचदरम्यान सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने निवड समितीशी चर्चा करणार आहे. याचसोबत विराट कोहलीशीही याबद्दल चर्चा केली जाईल, असं गांगुलीने स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या नवीन संविधानानुसार प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या चर्चेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे धोनीबद्दल बीसीसीआयचं नवीन प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.