जिओव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट IUC (इंटरकनेक्ट युजेस चार्ज) दर आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना अजून एक दणका दिला आहे. कंपनीने 19 रुपये आणि 52 रुपयांचे दोन स्वस्त प्रिपेड रिचार्ज पॅक बंद केलेत. अनुक्रमे एक दिवस आणि सात दिवस इतकी या दोन्ही पॅकची वैधता होती. हे पॅक बंद झाल्यामुळे आता ग्राहकांना किमान 98 रुपयांचा कॉम्बो-पॅक रिचार्जसाठी उपलब्ध असणार आहे.

बंद केलेल्या 19 रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित कॉलिंग आणि 150 एमबी डेटा मिळत होता. तसेच त्याशिवाय 20 SMSची सुविधाही देण्यात आली होती. दुसरीकडे 52 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. त्याशिवाय 70 SMSचाही लाभ मिळत होता. परंतु जिओनं आता हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत.

आणखी वाचा- ‘जिओ’चे चार All IN ONE प्लॅन लाँच ; दररोज 2GB डेटा आणि कॉलिंग

आययूसी दरांबाबत घोषणा केल्यानंतर कंपनीने 10 ऑक्टोबर रोजी IUC अंतर्गत टॉपअप प्लॅन भारतीय बाजारात उपलब्ध करून दिले होते. जिओव्यतिरिक्त अन्य नेटवर्क क्रमांकावर फोन करण्याचे प्रमाण अधिक असलेले ग्राहक त्या टॉपअप प्लॅन्सद्वारे रिचार्ज करु शकतात.  युजर्ससाठी 10 ते 1000 रुपयांचे आययूसी टॉप-अप रिचॅर्ज पॅक उपलब्ध आहेत.

दरम्यान, बंद केलेले दोन्ही रिचार्ज प्लॅन कंपनी 2020 मध्ये पुन्हा लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, 1 जानेवारी 2020 पासून ट्राय आययूसी दर हटवण्याचीही शक्यता आहे. मात्र, अद्यापपर्यंत ट्रायकडून आययूसीबाबत काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.