पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे.त्यामुळे नागरिक सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत घरात बसल्याचे दिसत आहे. पण सध्या घरात बसून काय करावे हा प्रश्न त्यांना पडला आहे.

अनेकांनी वेळ घालवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार केला आहे. त्यामध्ये अॅमेझॉन प्राईम, हॉट स्टार, नेटफ्लिक्स अशा अनेक अॅपचा समावेश आहे. अनेक अॅपने तर यूजर्ससाठी फ्री सेवा सुरु केली आहे. अशातच सोशल मीडियावर एकेकाळी अनेकांची मने जिंकणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील मालिका ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे.

बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य अधिकारी शशी शेखर प्रेक्षकांच्या या मागणीवर विचार करत असल्याचे दिसले. त्यांनी ट्विटमध्ये ‘आम्ही मालिका पुन्हा दाखवण्यासाठी मालिकेच्या स्वामित्व हक्क धारकांशी या विषयी चर्चा करत आहोत. तुम्हाला याबाबत लवकरच कळवू’ असे म्हटले आहे.

छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा मालिका आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात असतात. त्यापैकी दोन म्हणजे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही मालिका. दूरदर्शनवर लागणाऱ्या या मालिका पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे. जर या मालिका पुन्हा छोट्यावर दाखवण्यात आल्या तर ‘मै काल हूँ….’ आणि ‘मंगल भवन अमंगल हारी… ‘ या ओळी कानावर पडतील