|| अपर्णा देशपांडे

आताच्या पिढीच्या बोलण्यात वारंवार ‘फ’, ‘भ’ किं वा ‘च’चा शब्दप्रयोग के लेली भाषा ऐकायला मिळते. यातील बहुतेक शब्दप्रयोग सरळसरळ लैंगिक अर्थवाचक. त्यांचा वापर तरुण पिढीत इतका रुळला आहे, की बोलणाऱ्यालाही काही विशेष वाटत नाही आणि ऐकणाऱ्यालाही. आक्षेप घ्यावा, तर ‘तुम्ही म्हातारे, मागासलेल्या विचारांचे’ असं ऐकायला मिळतं! पूर्वी फक्त संतापाच्या वेळी शिव्या म्हणून असे शब्द वापरले जायचे. आता मात्र अनेकदा वैताग, नाराजी इतकं च नाही तर अगदी आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, सामान्य उद्गारांसाठीही हे शब्द वापरले जातात. त्या शब्दांचे मूळ अर्थ आपण कधी विसरलो? जगणं बदललं असलं, तरी पावलोपावली ‘फ’कार आणि ‘च’काराचा वापर करणं खरोखरच आपल्या अभिव्यक्तीचं योग्य प्रदर्शन करणारं असतं का?

‘‘ओ… फ*! पाऊस सुरू झाला?’’

‘‘‘धिस बॅड अ‍ॅ**ल… रिक्षावाला आता माटुंग्याला यायला नाही म्हणणार. धिस **ग रेन!’’

‘‘यू… क्रॅ …प!  पाणी उडवत गेला अंगावर!’’

‘‘ए… चु**… सा* छत्री दे ना!’’

‘‘पाण्यात जायला फा** रे  याची.’’

‘‘तो  भ**? त्याच्या वाट्याला जाऊच नका ***** सा*.’’

‘त्या’ अक्षरांच्या जागी स्टार केलेले असूनही ही वाक्य वाचायला अभद्र,अश्लाघ्य, किळसवाणं वाटलं ना? पण दुर्दैवानं खूप सामान्य व्हायला लागलं आहे अलीकडे असं बोलणं. भावनाहीन शब्द फेकायचे नुसते! हे ऐकून वाटतं, की समृद्ध भाषा अस्तित्वात असतानाही सवंग भाषा का वापरतात लोक? विशेषत: तरुण पिढी. आपलं तरुण अपत्य त्यांच्या मित्रमंडळीत, कॉलेजमध्ये, फोनवर, ऑफिसमध्ये बोलताना ऐका. काळजी करण्यासारखं जिव्हास्खलन आहे हे. काही शब्द तर इतके ‘उदंड जाहले’ आहेत की तरुण पिढीला त्यावरून फटकारल्यावर ते आपल्यालाच वेड्यात काढतात. हे त्यांचं ‘न्यू नॉर्मल’ आहे म्हणतात. वयाचं, पिढ्यांमधील अंतर ठसठशीतपणे जाणवेल अशीच ही आजच्या तरुणाईची भाषा आहे.

‘‘तुझ्या ‘टीम लीडर’नं आता तुला चक्क ‘यू फ** जर्क’ म्हटलं रे समीर. मी ऐकत होतो. हे रे काय बोलणं?’’ बाबा म्हणाले.

‘‘चिल बाबा! हे असंच चालतं हल्ली. इतकं काही नाही त्यात.’’

‘‘पण हे ‘असंच’ का चालतं? तुम्ही चालवून घेता म्हणून चालतं ना?’’

‘‘नसतं सोवळेपण पांघरायची काय गरज आहे बाबा? तुम्ही अशा शब्दांशी लगेच अर्थानं आणि भावनेनं जोडले जाता, म्हणून तुम्हाला ते वाईट वाटतं. पण आम्ही लोक त्याला भावनेशी जोडत नाही. आमच्यासाठी तो व्यक्त होण्याचा एक मार्ग आहे बस!’’

या तरुणांना म्हणावंसं वाटतं, शब्दांना नुसता अर्थच नाही, तर गंध, रंग, रूप, भावना, लय, सगळं असतं रे! तुम्हाला कधी समजणार ?

आम्ही कुमारवयीन असताना एकदा टीव्हीवर गोविंदाचं, त्याच्या चित्रपटातलं गाणं लागलं होतं- ‘मेरा शर्ट भी सेक्सी, मेरी पॅन्ट भी सेक्सी…’. तावातावानं येऊन आईनं टीव्ही बंद केला. म्हणाली, ‘‘असलं काही ऐकण्यापेक्षा बाहेर जाऊन भरपूर खेळा.’’ बोलताना चुकून भाऊ ‘च्या**’ म्हणाला तर हातातली वाटी फेकून मारली तिनं! ‘हे चालणार नाही’ असं ठणकावून सांगितलं. नंतर काहीच वर्षांत तरुण मुलामुलींत छान, गोड, आकर्षक या शब्दांना एकच पर्यायी शब्द आला- ‘सेक्सी!’ ‘मस्त सेक्सी चप्पल घेतलीस गं!’ किंवा ‘आज डिनरचा प्रोग्राम? वॉव सेक्सी!’ असे शब्द बोलताना ऐकायला येऊ लागले. त्या शब्दाच्या मूळ अर्थाशी फारकत झाल्यासारखा तो शब्द सहज रुळला (!). म्हणजे त्या वेळी  ‘आकर्षक’ किंवा ‘दिलखेचक’ अशा अर्थानं हा शब्द मुलं अगदी सहज वापरत.  पुढे त्याचं मोठं वाईट्ट भावंडं येणार आणि हा शब्द तेव्हा मिळमिळीत झालेला असणार, असं त्या वेळी कु णाला वाटलं नव्हतं. इंग्रजी, हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि अक्राळविक्राळ  समाजमाध्यमांतून आयात झालेल्या अनेक देशी-परदेशी शब्दांनी तरुणाईची भाषाच बदलवून टाकली. काळानुरूप टीव्ही वाहिन्यांवर संपूर्ण कुटुंबासोबत कुठलीही दृश्यं बघताना कशी आपली नजर मरत गेली, तसं आजच्या तरुणाईचे संवाद ऐकताना आपले कान ‘वारतायत’! त्यातून वेब वाहिन्यांच्या भाषेनं तर पार मर्यादाच सोडलीय.

नालायक, दळभद्री, वेडी, मूर्ख… अशा रागीट संबोधनांची जागा पाश्चात्त्यांनी संक्रमित केलेल्या ‘फ’च्या शब्दांनी कधी घेतली ते कोवळ्या पोरापोरींनाही कळलं नाही. हा ‘फ’चा व्हायरस त्यांच्या शाब्दिक ‘हार्ड डिस्क’ला पार करप्ट करून बसलाय. मोठं दुर्दैव म्हणजे तरुण-तरुणींना याशिवाय बोलताच येत नाही. अनेक साधे साधे शब्द, जसं- ‘जाऊ दे, मरू दे’, ‘खड्ड्यात जा’, ‘बापरे’, ‘आईगं!’, ‘जबरदस्त’, ‘शी!’, यांसारख्या अनेक उद्गारवाचक शब्दांसाठी एकच शब्द  वापरला जाऊ लागला- ‘फ*’! सरळ सरळ लैंगिक क्रियादर्शक शब्द!

सरलाताई मुलीचा डबा भरत होत्या. मुलगी फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. नकळत आईच्या कानावर पडलं, ‘‘आज फिजिक्सच्या वर्गात नको बसू या. सुट्टा कॉर्नरला चहा-सँडविच मारू. लेट्स बंक दॅट फ*ग लेक्चर!’’  बॅगेत डबा कोंबून लेक निघाली. ती काही तरी खटके ल असं बोलली हे आईला समजलं. ‘गूगल’ करून त्यांनी अर्थ बघितला. सुट्टा (सिगारेट) शब्द पटकन नाही सापडला, पण दुसऱ्या शब्दाचा अर्थ वाचून आई बिचारी काळजीत पडली.

टीव्हीवर खास तरुणाईसाठी असलेल्या एका कार्यक्रमात सहभागी मुला-मुलींच्या तोंडी एका वाक्यात ऐकण्यासारखे शब्द कमी अन् ‘बी…प’ जास्त असतात. तिथे थोडं तरी बंधन आहे म्हणून ठीक! निदान ‘बीप’ तरी ऐकायला मिळतं. टीव्हीवर इंग्रजी चित्रपट पाहातानाही बीप ऐकायला आणि ‘सबटायटल्स’मध्ये ** जास्त दिसतात. कॉलेज कट्ट्यावर, दैनंदिन संवादात, ऑफिसमध्ये या ‘फ’च्या बाराखडीचा नको तितका आणि ‘सर्वमान्य’ सुळसुळाट झाला आहे. अनेक मालिकांमध्ये लैंगिकता, नग्नता, अभद्र शब्द यांचा बीभत्स भडिमार आहे. तिथे लिहिणारे व्यावसायिक लेखक मुद्दाम अशी भाषा वापरत असावेत का?

एखाद्या गोष्टीतून स्वर्गसुख वाटतंय किंवा आनंद वाटतोय, हे निदर्शनास आणताना शारीरिक सुखाशी निगडित वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा वापर इतक्या वेगात झाला, की हे चूक आहे, याला आवर घालायला हवा, याची जाणीव होण्याआधीच हे शब्द तरुणांच्या जिभेवर घट्ट रुतून बसलेदेखील!

तशी  शिवराळ भाषा समाजाला नवीन आहे का? मुळीच नाही. पण सभ्य-असभ्यतेच्या व्याख्या ठरवण्यात भाषा ही एक मुख्य मानक होती. उठता बसता लाह््या फुटल्यासारखे असभ्य शब्द असे फुटत नसत आणि सर्वच स्तरातील लोक सर्रास अपशब्द वापरत नसत. लैंगिक कृती हा आधीपासूनच शिव्यांचा गाभा राहिला आहे. सतराव्या शतकाच्या शेवटी  ‘फ*’ हा शब्द एका इंग्रजी कवितेत आल्यानं त्याची प्रचंड चर्चा झाली होती. वाईट गोष्टींचा प्रसार फार पटकन होत असतो, या नियमानुसार तो प्रचलित झाला आणि १९६५ मध्ये या शब्दाला शब्दकोषात जागा मिळाली. भाषा हा बदलत्या समाजाचा आरसा असतो म्हणतात. मग आरशातलं हे विद्रूप रूप सगळ्यांना आवडायला लागलंय का? आपण अनावश्यक लैंगिकता अशी चव्हाट्यावर आणतोय याची जाणीव तरुणाईला आहे का? सवंगता अंगात भिनली की नजर बोथट आणि जाणिवा शिथिल होतात याचा अनुभव घेतोय का आजचा समाज?

याचा अर्थ फक्त स्त्रियांनी अथवा मुलींनीच सावध व्हावं आणि पुरुषाला दैनंदिन संभाषणात ही स्वैरता असावी असा मुळीच नाही. जबाबदारी तर लिंगातीत आहे, म्हणून ही धुरा आजच्या पालकांनी खांद्यावर घ्यायला हवी. त्यांनी आपल्या कोवळ्या वयातील पाल्याला सतत शाब्दिक सभ्यतेची जाणीव देत राहायला हवं. आज जी पिढी पन्नाशीच्या मागेपुढे आहे, त्यांनीही  ‘भ’ आणि ‘च’च्या बाराखडीतील आई-बहिणीवरील शिव्या ऐकल्या आहेत, पण इतका सर्रास रोजच्या बोलण्यात त्याचा वापर नव्हता. अनेक स्टॅण्ड अप कॉमेडीच्या कार्यक्रमांमध्ये तर तरुण- तरुणी दोघंही

आई-बहिणींवरील वाईट शब्द पेरतच बोलत असतात. हे मात्र जरा अति वाटतं. बरं ऐकणारे, प्रसारण करणारे, सगळे हे नुसतं ऐकतच नाही, तर ‘एन्जॉय’ करतात. त्यांना जर कुणी त्यावरून टोकलं, तर ते समोरच्याला मागासलेले, म्हातारे झालेले, असमंजस ठरवतात. पण मग ‘चालतंय तर चालू द्या’ म्हणून दुर्लक्ष कसं करायचं?  पूर्वी निदान स्त्रियांच्या तोंडी लैंगिकतेशी निगडित शब्दसमूह सर्रास कधीच नसत. पुरुषांनी मात्र आतली मळमळ ओकताना बीभत्स, अर्वाच्य आणि लैंगिकता उघड्यावर आणणाऱ्या भाषेचा मुक्त वापर केला.

मनात लपलेल्या संताप नावाच्या राक्षसाला शांत करण्यात शिव्यांचा वाटा आहे हेदेखील कबूल करावं लागेल. पु.ल.नी म्हटल्याप्रमाणे शिवी ही सोड्याच्या बाटलीप्रमाणे फुटली पाहिजे, तरच संतापाचं पूर्ण स्वरूप आकारबद्ध होतं. शिवीत आशयाला नाही, तर आवेशाला महत्त्व आहे. यात हे लक्षात येतं, की फक्त संतापाला वाट करून देताना याचा वापर अधोरेखित होतो, उठताबसता, चालताबोलता नाही!

बेंजामिन बर्गन यांच्या ‘हऌअळ ळऌएा***’ या पुस्तकाविषयी ऐकलं असेल. त्यात त्यांनी शिवराळ भाषा, समाजाची नैतिकता, जिभेच्या शील-अश्लीलतेच्या मर्यादा, त्याचे पडसाद याचा बौद्धिक ऊहापोह केला आहे. ही जागृती आपल्याकडे येणं गरजेचं आहे याची अजून आपल्याला जाणीव झालेली नाही. काही प्रचंड लोकप्रिय, प्रेरणादायी समुपदेशक, वक्ते आहेत, जे तरुणाईला त्यांच्यापरीनं मार्गदर्शन करत आहेत, हे एक आशदायी चित्र.

जिव्हास्खलनातून आजची पिढी सुरक्षित राहावी असं वाटत असेल, तर नव मातापित्यांना जागरूक राहावं लागेल. आधी स्वत:च्या जिभेला आणि मेंदूला ‘करप्ट’ होण्यापासून सावरावं लागेल. घरातील तरुण मुला-मुलींना त्यांचं हे असं बोलणं लहान मुलांच्या भाषेवर किती वाईट परिणाम करतंय हे सांगत राहावं लागेल. कोवळ्या पिढीच्या मेंदूतील भाषेची हार्डडिस्क करप्ट न होऊ देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहायला हवा, असं मला वाटतं.

adaparnadeshpande@gmail.com