आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची गौरव यात्रा सुरू आहे. ५८ दिवसांच्या या यात्रेमध्ये त्या राज्यभराचा दौरा करणार आहेत. दरम्यान, या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी जोधपूरमध्ये वसुंधरा राजेंना विरोधाचा सामना करावा लागला. माध्यमांतील वृत्तानुसार, पीपाड येथे रात्री उशीरा त्यांच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आली, यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं. तर काही ठिकाणी अशोक गहलोत यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, विरोधानंतरही वसुंधरा राजेंनी ठरल्याप्रमाणे सर्व सभांना संबोधित केलं, पण रात्री मुक्कामाला खेजडला येथे न थांबता त्या जयपूरला रवाना झाल्या. रक्षाबंधन असल्यामुळे पुढील तीन दिवसांसाठी त्यांची यात्रा स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  ओसिया येथे वसुंधरा राजे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. देचू येथे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली, शेरगढमध्ये काही जणांनी त्यांचे पोस्टर फाडले. तर भोपालगड विधासभा क्षेत्रातील बावडी येथे सभेच्या आधी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या एका नेत्याच्या इशाऱ्यावरुन हे घडवण्यात आलं. ज्या लोकांनी राज्यासाठी काहीही केलं नाही, सत्तेपासून दूर असल्यामुळे ते बावचळले आहेत म्हणून ते असं कृत्य करत आहेत. एका महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण आम्ही घाबरणार नाही, नारीशक्ती कोणालाही घाबरत नाही. राजस्थानसाठी माझा जीव गेला तरी मी माझं नशीब समजेल, अशी प्रतिक्रिया या संपूर्ण घटनेवर बोलताना वसुंधरा राजे यांनी दिली.

ओसिया येथे काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, पण बळाचा वापर करुन त्यंना हटवण्यात आलं. पीपाड येथे दगडफेकीची घटना समोर आली आहे, पण गाड्यांचं नुकसान झालं नाही, अशी माहिती येथील डीआयजी राघवेंद्र सुहासा यांनी दिली.

३० सप्टेंबरपर्यंत वसुंधरा राजेंची गौरव रथ यात्रा सुरू राहणार आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी चारभुजानाथ मंदिराच्या येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली होती. या यात्रेचा पहिला टप्पा संपला असून आता दुसरा टप्पा सुरू आहे.