विजय हजारे चषकात मुंबईने आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. बंगळुरु येथे झालेल्या सामन्यात मुंबईने रेल्वेवर १७३ धावांनी मात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर मुंबईने ५० षटकांमध्ये ४०० धावांपर्यंत मजल मारली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाडनेही फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबईची सुरुवात अडखळती झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या ३ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉ सोबत शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. पृथ्वी शॉने ८१ चेंडूत १२९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. पृथ्वी माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादवच्या सहाय्याने संघाचा डाव सावरला. रेल्वेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत श्रेयसने ११८ चेंडूत १४४ धावा पटकावल्या. श्रेयसने आजच्या सामन्यात तब्बल १० षटकार तर ८ चौकार ठोकले. दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवनेही ६७ धावांची अर्धशतकी खेळी करुन श्रेयसला चांगली साथ दिली. या खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात ४०० धावांचा टप्पा गाठला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या रेल्वेच्या संघाची गाडी सुरुवातीपासूनच रुळावर आली नाही. ठराविक अंतराने मुंबईच्या गोलंदाजांनी रेल्वेच्या फलंदाजांना माघारी धाडण्याचा सपाटा चालू ठेवला. यामुळे रेल्वेचे फलंदाज मोठी भागीदारी रचू शकले नाहीत. रेल्वेकडून सलामीवीर कर्णधार सौरभ वाकसकरने ४८ धावा पटकावल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने ३ तर धवल कुलकर्णीने २ बळी घेतले. रेल्वेचा संघ ५० षटकात केवळ २२७ धावांपर्यंत मजल मारु शकला.

अवश्य वाचा – क्रिकेट रणरागिणी