‘आणखी पु. ल.’ विशेषांक प्रकाशनाच्या निमित्ताने..

पुणे : ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘शब्दवेध’निर्मित ‘अपरिचित पु. ल.’ या साहित्य, संगीतमय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता टिळक स्मारक मंदिरात होणारा हा विशेष कार्यक्रम सर्वासाठी खुला असणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, गायक अभिनेते चंद्रकांत काळे यांचे असून संगीत नरेंद्र भिडे यांचे आहे. कलावंत आहेत चंद्रकांत काळे, गिरीश कु लकर्णी आणि सुनील अभ्यंकर. साथसंगत आहे आदित्य मोघे आणि अपूर्व द्रविड यांची.

चंद्रकांत काळे या कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाले, की मराठी साहित्यविश्वात पु. ल. देशपांडे हे ख्यातकीर्त विनोदी लेखक म्हणूनच प्रसिद्ध आहेत. पु.ल. हे अष्टपैलू कलावंत म्हणून जसे ओळखले जातात तसेच हे अष्टपैलुत्व त्यांच्या लेखनातूनही आपल्याला आढळून येते. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी चिंतनात्मक, गंभीर स्वरूपाचे, तरल काव्यात्मक, रसरशीत प्रवास-वर्णनात्मक लेखन केलेले आहे. ‘अपरिचित पु. ल.’ या कार्यक्रमात विनोदाबरोबरच अशाच काही लेखनाचे दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पुलंच्या काही कविताही या कार्यक्रमात गीत स्वरूपात गायल्या जाणार आहेत.

खोगीर भरती, अघळपघळ, हसवणूक, गाठोडं, उरलसुरलं, मी एक शून्य इ. ललित संग्रहातील लेखनावर आधारित हा कार्यक्रम आहे. अर्थातच पुलंचं जे साहित्य खूप लोकप्रिय आणि गाजलेले आहे, ज्यावर आधीच काही सादरीकरण झालेलं आहे (व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ, गणगोत, असामी असामी, नाटके, चित्रपट इ.) ते टाळण्यात आले आहे, म्हणूनच त्याचे नाव ‘अपरिचित पु. ल.’ असे असून, ‘आणखी पु. ल.’च्या प्रकाशनानिमित्त पुणेकर रसिकांना या कार्यक्रमाचाही लाभ होणार आहे.

‘आणखी पु. ल.’ प्रकाशन

’कधी – शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर

’कुठे – टिळक स्मारक मंदिर

’वेळ – सायंकाळी साडेसहा वाजता

मुख्य प्रायोजक  – परांजपे स्कीम्स

सहप्रायोजक – चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.