काँग्रेसमध्ये तब्बल १८ वर्षे राहिल्यानंतर ‘हात’ सोडून ‘कमळ’च्या पाठी धावलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस का सोडली याचं खरं कारण राहुल गांधी यांनी दिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण ओळखतो. त्यांचे विचार आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे ते का सोडून गेले हेही आपल्याला माहीत असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी १० मार्च रोजी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर ११ मार्च रोजी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयावर राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं. राहुल गांधी म्हणाले की, “ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरीकडे भाजपा-आरएसएसची विचारधारा आहे. ज्योतिरादित्या शिंदे यांची विचारधारा मला माहीत आहे. ते माझ्यासोबत कॉलेजमध्ये होते. आमची चर्चा झाली. त्यांना मी चांगल्याप्रकारे ओळखतो. ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या राजकीय भविष्याची भीती वाटली आणि त्यांनी आपली विचारधारा खिशात घातली. त्यांनी आरएसएसची कास धारली.”

ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात काय मिळणार, यावरही राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, “ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात मान-सन्मान मिळणार नाही. एवढच नाही तर त्यांच्या मनाला समाधानही मिळणार नाही.”