बंगळुरु येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी २० सामना खेळण्यात येणार आहे. पण क्रिकेटप्रेमींना काहीशी निराश करणारी एक बातमी सध्या चर्चेत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगळुरू आणि त्याच्या आसपासच्या परिसरात रविवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यासारखा हा सामनादेखील रद्द झाला तर क्रिकेटप्रेमींची भलतीच निराशा होण्याची शक्यता आहे.

धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला टी २० सामना खेळण्यात येणार होता, पण तो रद्द करावा लागला. कारण धर्मशाळा येथे सतत तीन दिवस पाऊस सुरु होता. त्यामुळे मैदानातून पाणी काढणे शक्य झाले नव्हते. त्याचसोबत पावसामुळे मैदानही खेळ खेळण्यायोग्य नव्हते. त्यामुळे धर्मशाळा येथील सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण दुसरा सामना मात्र मोहालीमध्ये होता. हा सामना चांगलाच रंगला. त्यामुळे या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामनाही रंगतदार होणार असा क्रिकेटप्रेमींना विश्वास आहे. पण पावसामुळे कदाचित हा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते.

दरम्यान, मोहालीच्या सामन्यात कोहलीच्या आक्रमक फलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निरुत्तर झाली. उपकर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोहालीत कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना केला. रोहित मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. पंत धावांसाठी झगडत असताना मधल्या फळीत श्रेयस अय्यरमुळे भारताची फलंदाजीची ताकद वधारली आहे. याचप्रमाणे हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा हे दोघे टी २० क्रिकेटमध्ये फटकेबाजी करण्यात वाकबगार आहेत. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या नियमित वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत दीपक चहर आणि नवदीप सैनी यांना संधीचे सोने करत आहेत. वॉशिंग्टन सुंदरनेही अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

जर तिसऱ्या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तरी भारताला चिंता करण्याचे कारण नाही. सध्याच्या घडीला भारतीय संघ मालिकेमध्ये १-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर भारताचा मालिका विजय होऊ शकतो.