लोकसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विविध भागांतील आमदारांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतही हाच सूर उमटला.  ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे’ गायकवाड यांनी सांगितले.

राज्यमंडळाची बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वाभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. आतापर्यंत पालक, विद्यार्थ्यांच्या काही गटांकडून करण्यात येणारी मागणी आता राजकीय नेत्यांनीही उचलून धरली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांतील नेते आणि काही मंत्र्यांनीही समाजमाध्यमांवरून दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. याबाबत गायकवाड यांनी आमदारांशी चर्चा केली. या बैठकीतही परीक्षा रद्द करू नयेत. त्या लेखी घेणेच योग्य होईल. मात्र, त्या पुढे ढकलण्यात याव्यात असे मुद्दे आमदारांनी मांडले.

करोनाचे संकट आणि अभ्यास अशा दुहेरी तणावात विद्यार्थी आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षेला प्राधान्य आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून त्याबाबत काही दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री