वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर पावसा-पाण्यात लांबच लांब रांगा लावणारे, महागडे अर्ज व माहितीपुस्तिकांवर हजारो रुपये खर्चणारे, त्यानंतर ‘कटऑफ’ पाहण्यासाठी म्हणून तंगडतोड करणारे विद्यार्थी-पालक असे चित्र अकरावीच्या प्रवेशाच्या तोंडावर आता दिसत नाही. कारण, त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या शारीरिक आणि थोडय़ाफार आर्थिक तोशिसीचा भाग तरी गेल्या काही वर्षांत ऑनलाइन प्रवेश-प्रक्रियेमुळे मुंबई-पुण्यापुरता का होईना संपला आहे. पण, अमुक अमुक महाविद्यालयात अमुक शाखेला प्रवेश मिळेल काय यासाठी ज्या काही ताणतणावातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना जावे लागते तो आजही कायम आहे. उलट पर्याय जितके जास्त, तितका गोंधळ आणि डोक्याला ताप अधिक.  अकरावी ऑनलाइन प्रवेश-प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचे प्रयत्नही अनेकदा झाले. आताही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मुंबईच्या ऑनलाइन प्रवेशासाठी ‘सर्वसाधारण गुणवत्ता यादी’ तयार करण्यात येणार आहे. पण, ज्या पद्धतीने हे बदल राबविण्यात येणार आहेत, त्यावरून तरी या यादीमागची संकल्पनाच सरकारी अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली नाही, असे दिसते. एक तर अकरावी प्रवेशांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटय़ाच्या जागा ऑनलाइनमधून भराव्यात, दुसऱ्या-तिसऱ्या फेरीसाठीच्या उपलब्ध जागांचे तपशील जाहीर करून विद्यार्थ्यांकडून पुन्हा पसंतीक्रम भरून घ्यावेत, असे अनेक बदल करण्याची मागणी पालकांकडून सातत्याने होते आहे. मात्र, या सर्व महत्त्वाच्या सूचना धुडकावून वरवरच्या सुधारणा करण्यातच रस असल्याचे या निर्णयावरून शिक्षण विभागाने दाखवून दिले आहे. दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांकडून एकदाच म्हणजे पहिल्या जागावाटप यादीच्या आधीच महाविद्यालयासाठीचे कमाल ६० पसंतीक्रम भरून घेतले जाणार आहेत; तेही गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी. महत्त्वाचे म्हणजे एकदा पसंतीक्रम भरून घेतल्यानंतर त्याआधारेच तिन्ही जागावाटपाच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. थोडक्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीनंतर महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. मग या गुणवत्ता यादीचा उपयोग काय? तिसरी सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्य शिक्षण मंडळाने ज्या उद्देशाने दहावी-बारावीची गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता त्यालाच आता हरताळ फासला जाणार आहे. कारण, सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या निमित्ताने पहिला-दुसरा कोण याचाही शोध घेणे शाळांना, महत्त्वाचे म्हणजे चाणाक्ष क्लासचालकांना शक्य होणार आहे. मग, या विद्यार्थ्यांची छायाचित्रे झळकावून खोटेच दावे करणाऱ्या जाहिरातींचेही फावेल. या स्पर्धेत आपण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी अशा इतरही शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना घुसवणार आहोत, ते वेगळेच. ज्या ठिकाणी खूप जास्त महाविद्यालये आहेत, विद्यार्थी आहेत आणि मुळात आपल्या आवडत्या महाविद्यालयाकरिता शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करण्याची इच्छा विद्यार्थ्यांमध्ये आहे, तिथे तरी ‘ऑनलाइन प्रवेश’ हा चांगला पर्याय आहे. यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखे प्रवेश मिळतील का, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. परंतु, ऑनलाइनमुळे अकरावीचे प्रवेश गुणवत्तेनुसार होण्यास निश्चितपणे मदत झाली आहे. अर्थात त्यात कधी कधी सुधारणेच्या नावाखाली जे काही बदल केले जातात ते नव्या प्रश्नांना निमंत्रण ठरू नये इतकेच.