महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून रुग्णांचे हाल होत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल अनेकांना ऑक्सिजन, लस तसंच बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. अनेक राज्यांमध्ये तर न्यायालयाने याप्रकरणी मध्यस्थी केली आहे. दिल्लीतही अशीच परिस्थिती असून रुग्णालयाच्या पायऱ्यांवर रुग्ण उपचारासाठी वाट पाहत बसत आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयाबाहेर दाखल करुन घ्यावं यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांची गर्दी झाली होती.

रुग्णालयात बेड मिळावा यासाठी रुग्णालयाबाहेर जमा झालेली गर्दी विनवणी करत होती. यामध्ये ३० वर्षीय रुबी खान यांचाही समावेश होता. रुबी खान यांचे पती असलम खानदेखील यावेळी तिथे उपस्थित होते. तीन रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर असलम खान पत्नीला घेऊन येथे पोहोचले होते. मदत मिळत नसल्याने हतबल झालेले असलम खान पत्नीला दाखल करुन घेण्यासाठी अक्षरश: भीक मागत होते. “माझ्या पत्नीला दाखल करुन घ्या…नाही तर जगणार नाही,” अशी हतबलता ते व्यक्त करत होते.

“मी त्यांचे पाय पकडण्यासही तयार आहे. पण ते वारंवार बेड नसल्याचं सांगत आहेत. मी तिला जमिनीवर झोपवून उपचार देऊ का? मी तिला मरण्यासाठी कसं काय सोडून देऊ?,” असं सांगताना असलम यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. करोना उपचारांसाठी एलएनजेपी रुग्णालय हे राजधानीतील सर्वात मोठं रुग्णालय आहे.