शकुंतला फडणीस

‘मी आणि हसरी गॅलरी’ या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला त्या वेळी माझे वय होते पंच्याऐंशी. आजही पुस्तकाला खूपच छान प्रतिसाद आहे. आता माझे नवीन व्यक्तिचित्रसंग्रहाचे पुस्तक, ‘वेगळ्या वाटेने’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. थोडे देश-विदेशाचे प्रवास मी आणि शि. दं. नी केले. तेवीस दिवसांची युरोप सहल आम्ही अगदी सहजपणे निभावली. त्या वेळी माझे वय होते अठ्ठय़ाहत्तर आणि शि. दं. चे त्र्याऐंशी! आम्हाला कसलीही व्याधी नाही. निरोगी जीवनाची बहुमोल देणगी परमेश्वराने आम्हाला दिली आहे. हास्यविनोदाची संगत आहे. त्यामुळे आज ८९ व्या वर्षीही आनंद आणि उत्साह मिळतो आहे. विचारांचे संतुलन राखायलाही या सगळ्याची मदत होत असावी..

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
issue is Indians who went to work for a lot of salary and got caught up in Israel and Hamas war
युद्ध कुणाचं, लढणार कोण आणि मरणार कोण…

‘अवघे पाऊणशे वयमान’ याच्या आधीचे शब्द आहेत ‘म्हातारा इतुका न..’ माझ्या बाबतीत बोलताना शब्द येतील ‘म्हातारी इतुकी न..’ यातील ‘न’ हा एकाक्षरी शब्द मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो नकारार्थी नाही, होकारार्थी वाटतो. ‘वय वाढले, अमुक झेपत नाही, तमुक जमत नाही’ अशी नकारात्मक भूमिका कशाला घ्यायची? उलट वय वाढले की विचारांची परिपक्वता वाढते. स्वत:चे, स्वत:च्या कामाचे, तटस्थपणे मूल्यमापन करता येते हे किती महत्त्वाचे आहे! याही वयात आपण काही चांगले काम करू शकतो हा आत्मविश्वास असला तर आपले जीवन सुखी, आनंदी होऊ शकते.

मी थोडेफार विनोदी लेखन करणारी. पती शि. द. फडणीस तर विख्यात हास्यचित्रकार. घरात आनंदी, दिलखुलास वातावरण असते. त्यामुळे असेल कदाचित, आमची दोघांचीही वृत्ती सकारात्मक आहे. किरकोळ अडीअडचणीचा बाऊ करायचा नाही,

न झेपणारे काम स्वीकारायचे नाही अन् स्वीकारलेले काम अगदी मनापासून करायचे अशी मानसिकता दोघांचीही आहे. माझे माहेर विदर्भात अमरावतीला. वडील वा. वि. बापट प्रसिद्ध वकील होते. त्यांना ललितकला आणि साहित्य यात रुची होती. आई सधन कुटुंबातील सराफकन्या. ती स्वभावाने आनंदी, हौशी होती. आई-वडील दोघेही प्रागतिक विचारांचे. त्यामुळे साठ-सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी मुलींना पदवीधर केले. आता मुलींच्या शिक्षणाची झेप खूपच उंच आहे. पण आमच्या वेळी विदर्भात तरी, मुलींनी पदवीधर होणे विशेष समजायचे. आम्ही चार बहिणी, सगळ्यात धाकटा, एकुलता एक भाऊ. पण आई-वडिलांनी सर्वाना समान वागणूक दिली. मुलींना कमी लेखले नाही की मुलाचे अति लाड केले नाहीत. पुस्तकी शिक्षणाबरोबरच वक्तृत्व, अभिनय, क्रीडा वगैरे प्रकारांनाही घरातून प्रोत्साहन होते. त्यामुळे सभाधीटपणा, समयसूचकता, खिलाडूपणा वगैरे गोष्टी सहजच मिळाल्या. या सगळ्याला माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे.

माहेरी सोवळे-ओवळे वगैरे कर्मकांड नव्हते. सासरी सासूबाईंचे सोवळे कडक नव्हते. त्यांना आणि माझ्या जावा – नणंदांनाही माझ्या लेखनाचे कौतुक होते. सासर कोल्हापूरला, माहेर अमरावतीला अन् आमचे बिऱ्हाड पुण्याला. सुरुवातीपासून स्वतंत्र राहायला मिळाले पण अडीअडचणीही आमच्या आम्हालाच निस्तराव्या लागल्या. मुलींना बाळदुखणी यायची त्यावेळी तर अगदी कठीण परिस्थिती व्हायची. अनेकदा आजारी मूल कडेवर घेऊन मी स्वयंपाक केलेला आहे. आर्थिक अडचणीही आल्या. साठ-पासष्ट वर्षांपूर्वी, केवळ ‘चित्रकारी’वर उपजीविका ही गोष्ट सोपी नव्हती. काही हितचिंतक म्हणायचेसुद्धा, ‘‘याला नाही नोकरी, नाही चाकरी. नुसती चित्रे काढून कितीसे पैसे मिळणार?’’ पण मी खंबीर होते. खासगी किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हटला की जम बसायला जरा वेळ लागतोच. प्राप्ती कमी-जास्त होणारच. पण लवकरच स्थिरता आली. अगदी खूप जरी नाही तरी आनंदाने संसार करण्याइतपत पैसे शि. दं. नी नक्कीच मिळवले.

शि. दं. चा स्टुडिओ घरातच. त्यांच्याकडे कामासाठी येणाऱ्यांची वर्दळ असे. घरी पै-पाहुण्यांचा राबता. सगळ्यांची खातीरदारी करावी लागे. त्यातच शि. दं. ना मदत, बाहेरची कामे, मुलींचा अभ्यास घेणे, घराचे सर्व व्यवस्थापन अशी सर्कस. माझी खूपच तारांबळ उडायची. या सर्व अनुभवांचा पुढे ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनाच्या संयोजनात उपयोग झाला. ‘हसरी गॅलरी’ हे

शि. दं.च्या चित्रांचे वैशिष्टय़पूर्ण प्रदर्शन. सुरुवातीला सगळी कामे आम्ही दोघेच करत होतो. प्रदर्शन काळात एकाच वेळी अनेक गोष्टींचे अवधान सांभाळावे लागते. हॉल ठरवण्यापासून तर प्रेक्षकांच्या गर्दीचे नियंत्रण करण्यापर्यंत बऱ्याच जबाबदाऱ्या असायच्या.

एकदा मात्र गर्दीचे नियंत्रण मला एकटीलाच करावे लागले. एका मोठय़ा शहरात प्रदर्शन लावले होते. रोज खूप गर्दी व्हायची. तशातच काही महत्त्वाच्या कामासाठी शि. दं. ना मुंबईला जावे लागले. प्रदर्शनाची सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर. एक दिवस गर्दी इतकी अनावर झाली की संयोजकांनी पोलीस बंदोबस्त मागवला. पोलीस आले अन् माझ्या जिवात जीव आला. त्यावेळपर्यंत माझ्या समयसूचकतेची अन् संयमाची जणू सत्त्वपरीक्षा चालली होती. संयोजकांचे सहकार्य उत्तमच होते. पण ती सर्व नवीन मंडळी. अशा अनपेक्षित अडचणीच्या वेळी नेमके काय करावे हे त्यांना कसे सुधरणार? कधी कधी मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको वगैरे असे. कसले तरी आंदोलन असे. अशा वेळी आमचे सर्व नियोजन आणि वेळापत्रक कोलमडून जाई. एकदा तर अशा कारणामुळे, प्रदर्शनाचा हॉलही मलाच साफ करावा लागला. परंतु वृत्तपत्रांनी आणि प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अशा गोष्टींचा शीण कधी जाणवला नाही.

‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनाने अनेक रसिकांच्या मनात घर केले आहे. प्रदर्शनासंबंधीचे अनुभव मी अधूनमधून लिहिले आहेत. ते लेख, तसेच ‘चतुरंग’ पुरवणीतील ‘झाली फुले कळ्यांची’ या सदरातील माझा लेख वाचून ‘मी आणि हसरी गॅलरी’ या पुस्तकाचा प्रस्ताव घेऊन प्रकाशक घरी आले. हे प्रकाशक म्हणजे सुरेश एजन्सीचे श्री. कारले. अरुणा ढेरे, शांताबाई शेळके, फ. मुं. शिंदे यांची पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. कारले यांनी नुसता प्रस्तावच दिला नाही तर पुस्तकनिर्मिती उत्तम केली. ‘अक्षरधारा’च्या सहयोगाने शानदार प्रकाशन समारंभही हौसेने केला. व्यासपीठावर विक्रम गोखले, रामदास फुटाणे, रविमुकुल असे मान्यवर होते. हे सर्व माझ्यासाठी खूप आनंददायी होते. हा समारंभ झाला त्यावेळी माझे वय होते पंच्याऐंशी! पुस्तकाला आजही खूपच छान प्रतिसाद आहे.

आता माझे नवीन  पुस्तक, ‘वेगळ्या वाटेने’ हा व्यक्तिचित्रसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. पुस्तकांसाठी मला तीन शासकीय आणि चार खासगी पुरस्कार मिळाले. त्याशिवाय ‘माई सावरकर स्मृतिसन्मान’, ‘मालतीबाई दांडेकर स्मृती पुरस्कार’, यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई यांच्या नावे ‘यशवंत-वेणू पुरस्कार’, असे काही पुरस्कार प्रतिष्ठित संस्थांकडून मिळाले.

टीव्ही मालिका वगैरे मी फारशा बघत नाही. ‘एपिक’, ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’,‘ डीडी भारती’ वगैरे अधूनमधून बघते. ‘इकडे म्हैस तिकडे वाघीण’ या शीर्षकाची एक फँटसी मी खूप पूर्वी लिहिली आहे. ‘एका म्हैशीने एका वाघाला पिटाळून लावले, हे कळल्यावर वाघीणबाईंनी वाघोबांची चांगलीच धुलाई केली.’ असे कथासूत्र. त्यानंतर अनेक वर्षांनी ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ बघताना रानरेडय़ांनी सिंहाला पिटाळून लावले असे दृश्य पाहिले. या योगायोगाची गंमत वाटली. थोडे देश-विदेशाचे प्रवास आम्ही केले. लंडन, न्यूयॉर्क, सिनसिनाटी वगैरे शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. तेवीस दिवसांची युरोप सहल आम्ही अगदी सहजपणे निभावली. त्यावेळी माझे वय होते अठ्ठय़ाहत्तर आणि शि. दं. चे त्र्याऐंशी! आम्हाला कसलीही व्याधी नाही. निरोगी जीवनाची बहुमोल देणगी परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आता वयोमानानुसार काही त्रास होतात ते वेगळे. कामाचे योग्य वेळापत्रक, साधा पण आरोग्यपूर्ण आहार, ताणविरहित दिनक्रम आणि योगासने ही आमची महत्त्वाची चतु:सूत्री आहे. हास्यविनोदाची संगत आहे. त्यामुळे आनंद आणि उत्साह मिळतो. विचारांचे संतुलन राखायलाही या सगळ्याची मदत होत असावी.

विनोदकार अंतर्यामी गंभीरच असतात. त्यांच्याही आयुष्यात बरे-वाईट प्रसंग येतच असतात. त्यातले कोणते गांभीर्याने घ्यायचे अन् कोणते हसण्यावारी न्यायचे याचा विवेक विनोदबुद्धीमुळे येतो. शि. दं. ना हे सहजच साधले आहे. त्यांच्या विनोदी चित्रांची तारीफ मी इथे करत नाही. तशी आवश्यकताच काय? पण गणित, व्याकरण, कायदा असे अवघड विषयसुद्धा शि. दं. च्या चित्रांनी सोपे केले आहेत. त्यांच्या कलेला ती किमया साधली आहे. आमच्या लग्नाला चौसष्ट वर्षे झाली. या काळात बरेचदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले पण प्रत्येक वेळी ते शांतपणे गुंता सोडवतात. नेमका निर्णय घेतात. विचलित होत नाहीत. सर्वसाधारणपणे, कठीण प्रसंगी विनोदकार गांगरून जात नाही.

कलावंत म्हणून ते मोठे आहेतच. पण माणूस म्हणूनही ते मोठे आहेत. एवढा लौकिक मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. असा थोर कलाकार माझा सहचर आहे याचा मला अभिमान वाटणारच. कलावंताच्या लहरीपणाबद्दल किंवा नादिष्टपणाबद्दल बराच गवगवा केला जातो. कलावंत लहरी का असतो हे मी खरेच समजू शकते. त्यावेळी त्यांना नवीन कल्पना सुचत असते. त्या सुंदर क्षणाचे स्वागत करताना त्यांना औपचारिक गोष्टींचे भानच नसते. तो सृजनाचा आवेग असतो. हे आपण एकदा समजून घेतले म्हणजे काही अडचणच उरत नाही.

बाहेरच्यांनी कितीही कौतुक केले तरी माणसाला घरच्यांचे सहकार्य महत्त्वाचे वाटते. लेखक किंवा कलावंत यांना त्यामुळे वेगळी ऊर्जा मिळते. माझ्या सासर-माहेरच्या सर्व मंडळींच्या शुभेच्छा सतत आमच्या पाठीशी आहेतच पण आमच्या दोघी लेकींचा उल्लेख करायलाच हवा. दोघीही गावातच म्हणजे पुण्यातच असतात. थोरली लीना (गोगटे) धाकटी रूपा (देवधर). लीना ‘बँक ऑफ इंडिया’च्या सेवेतून नुकतीच निवृत्त झाली आहे. ती हौशी अभिनेत्री आहे. बरीच बक्षिसे वगैरे मिळवते. धाकटी रूपा चित्रकार आहे.

शि. दं. च्या कामात तिची खूप मदत होते. संगणक, ई-मेल, स्कॅनिंग वगैरे ती बघते.

ही झाली दोघींची औपचारिक ओळख. त्यापलीकडची त्यांची खरी ओळख म्हणजे त्या दोघींचेही आई-बाबांबद्दलचे अपार निर्व्याज प्रेम! स्वत:चे अनेक उपक्रम सांभाळूनही आमच्यासाठी धावपळ करणार, पडतील ते कष्ट हसतमुखाने घेणार. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असोत, प्रवास असो की आजारपण असो. अगदी मनापासून आमची सुखसोय बघणार. मुलींप्रमाणे जावई आणि नातवंडेही आमची काळजी घेतात. कसलीही विवंचना आम्हाला पडू देत नाहीत. त्यामुळे आम्ही नेहमीच आनंदी असतो.

लेखनात अनावश्यक, चुकीचे शब्द लेखक खोडून टाकतो. चित्र काढतानाही कागदावरच्या अनावश्यक रेषा चित्रकार खोडून टाकतो. साधुसंत सांगतात, चुकीच्या, अनावश्यक विचारांची अडगळ दूर करावी. सुखाचा किरण नक्कीच दिसतो. रोजच्या जगण्या-वागण्यात आम्ही तसा प्रयत्न करत असतो.

sd_phadnis@yahoo.com

chaturang@expressindia.com