सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीसोबत आपण सहज संवाद साधू शकतो. पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्याप्रमाणे सोशल मीडियाचेही फायदे आणि तोटे आहेत. पुण्यातील एका घटनेमुळे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तीकडून महिलेची तब्बल चार कोटींची फसवणूक झाली आहे.

ज्येष्ठ महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. तुम्हाला आयफोन पाठवला असून तो तुम्हाला घेण्यासाठी ऑनलाइन पैसे भरावे लागतील असं त्याने महिलेला सांगितलं. कोणतीही खातरजमा करता महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत विविध खात्यांमध्ये ३ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपये जमा केले. मात्र ना आयफोन आला ना पैसे परत मिळाले. आपली फसवणूक झाल्याचं समजताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. इतकी मोठी रक्कम ऐकून पोलीसदेखील अवाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एक ६० वर्षीय महिला एका कंपनीत उच्च पदावर काम आहे. फेसबुकवर त्यांना ब्रिटनमधून एका व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये बर्‍यापैकी गप्पा सुरू झाल्या होत्या. आरोपीने त्यांच्याकडे मोबाइल नंबर मागितला. तो मिळाल्यानंतर दोघांमध्ये व्हॉटसअॅपवर चॅटिंग सुरू झाले. आरोपीने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्याच दरम्यान मी तुम्हाला आयफोन, दागिने आणि परदेशी चलन पाठवलं आहे. या सर्व वस्तू दिल्लीत कस्टममध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन बँकमध्ये पैसे जमा करा. तुम्हाला सर्व वस्तू मिळतील असे सांगितले.

यानंतर महिलेने जवळपास २५ बँकांच्या ६७ खात्यात ३ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पण आपण एवढी रक्कम देऊन देखील आयफोन किंवा इतर वस्तू मिळाल्या नाही यावरुन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व हकिकत सांगितली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.