मी मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो. त्याचा अहवाल मी दिला असून सरकारने नोव्हेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी अशी भूमिका माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुण्यात मांडली. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली जात आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

भाजपाच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हटले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, यावर मी काही बोलणार नसून कोणी काही म्हणेल यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नर्हे आंबेगाव येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टि्टयूटच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त नारायण राणे यांना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.शिवाजीराव कदम, उद्योजक संजय घोडावत यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टि्टयूटचे संस्थापक सुधाकर जाधव, आमदार भीमराव तापकीर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.