दिवसभरात ३० नवे रुग्ण

नागपूर : उपराजधानीतील विविध भागांत नवीन करोनाबाधित आढळण्याचे सत्र कायम असून  बुधवारी त्यात ३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरात आजपर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांच्या संख्येने तब्बल सहाशेचा पल्ला ओलांडला आहे. यापैकी े३९४ जण उपचारानंतर करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

नवीन बाधितांपैकी नऊ जण लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहात विलगीकरणात होते. त्यातील सहा जण बांगलादेश आणि २ जण नरखेड परिसरातील आहेत. पाच बाधित आमदार निवासात होते. हे सर्व मोमीनपुरातील रहिवासी आहेत. सोबत मेडिकलला उपचार घेणाऱ्या दोघांनाही करोना असल्याचे स्पष्ट झाले. एम्सच्या प्रयोगशाळेतही गोळीबार चौकातील एक तर खासगी प्रयोगशाळेच्या चाचणीतही हंसापुरीतील एकाला विषाणूची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच मेडिकलला सारीचा त्रास घेऊन दाखल झालेल्या भगवाननगर परिसरातील ७१ वर्षीय वृद्धाही करोनाबाधित असल्याचे पुढे आले.

सहा दिवसांत १३७ रुग्ण वाढले

उपराजधानीत गेल्या सहा दिवसांपासून झपाटय़ाने बाधितांची संख्या वाढत आहे. या काळात जिल्ह्य़ात तब्बल १२४ नवीन करोनाग्रस्तांची भर पडली. सर्वाधिक ४७ रुग्ण २९ मे रोजी आढळले. त्यानंतर ३० मे- १३ रुग्ण, ३१ मे- १९ रुग्ण, १जून – १९ रुग्ण, २ जून- २० रुग्ण, ३ जून रोजी १९ रुग्णांची भर पडली.

विदर्भात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर

विदर्भातील अकोला जिल्ह्य़ाने नागपूरला मागे टाकत यापूर्वीच सहाशे रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. अकोल्यात सध्या सर्वाधिक ६६७ रुग्णांची नोंद  झाली आहे. त्यापाठोपाठ सहाशे रुग्णांचा टप्पा ओलांडलेला नागपूर  हा विदर्भातील दुसरा जिल्हा आहे.