गेल्या २४ तासात देशात करोनाचे एकूण ५८,४१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या ८१ दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे करोना मृत्यूंच्या संख्येतही घट झाल्याचे दिसत आहे. मागील २४ तासात १,५७६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलपासून दोन महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूची नोंद शनिवारी झाली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५८,४१९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. शनिवारी दिवसभरात १,५७६ जणांना करोनामुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर ८६,६१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ वर पोहोचली आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९८ लाख ८१ हजार ९६५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ८७ लाख ६६ हजार ००९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ७१३ जणांचा करोनामुळ मृत्यू झाला आहे. तर देशात ७ लाख २९ हजार २४३ रुग्ण उपचाराधिन आहेत. आतापर्यंत देशात २७ कोटी ६६ लाख ९३ हजार ५७२ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळमध्ये १ लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव रुग्ण

आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. राज्यात शनिवारी ८,९१२ नव्या बाधितांची नोंद झाली होती. तर २५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात सध्या १ लाख ३२ हजार ५९७ अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. त्याखाली कर्नाटकचा क्रमांक लागतो. कर्नाटकात १ लाख ३० हजार ८७२ अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. त्यानंतर केरळ मध्ये दैनंदिन रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. केरळमध्ये शनिवारी सर्वात जास्त १२ हजार ४४३ रुग्ण आढळून आले. या राज्यात १ लाख ६ हजार ८६१ अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत.