राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रात मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली असून, काँग्रेस चार वाजता आपला निर्णय घेणार आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

Live Blog

20:36 (IST)11 Nov 2019
राष्ट्रवादीचे नेते राजभवनाच्या दिशेने

राष्ट्रवादी काँग्रेसला आता सत्ता स्थापनेसाठी राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं समजतं आहे. 

20:20 (IST)11 Nov 2019
शरद पवार यांच्याशी चर्चा होणं बाकी- काँग्रेस

शरद पवार यांच्याशी शिवसेनेला पाठिंबा द्यायाचा की नाही याबाबत काहीही ठरलेलं नाही अद्याप आमची राष्ट्रवादीशी चर्चा सुरु आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे 

18:11 (IST)11 Nov 2019
काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा शिवसेनेचा दावा

काँग्रेसने पाठिंबा दिल्याचा शिवसेनेचा दावा केला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सरकार स्थापनेचा दावा शिवसेनेकडून केला जाणार आहे 

18:06 (IST)11 Nov 2019
शिवसेनेचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल

शिवसेनेचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. यामध्ये सचिन अहीर, प्रियंका चतुर्वेदी,  आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले आहेत 

17:30 (IST)11 Nov 2019
शिवसेना नेते एकनाथ शिंदे राजभवनावर जाणार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राजभवनावर जाणार आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरु आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे राजभवनावर जाणार आहेत.

17:04 (IST)11 Nov 2019
उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा

काँग्रेसच्या बैठकी अगोदर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. राज्यात शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आमंत्रण मिळालं असून, काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या काँग्रेसची बैठक सुरू असून, त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे.

17:00 (IST)11 Nov 2019
महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सोनिया गांधी यांची बैठक सुरू

काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांची महाराष्ट्रातील नेत्यांशी बैठक सुरू झाली आहे. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील नेते बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते ए.के.अॅण्टोनी, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह दिल्लीतील नेते उपस्थित आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधी अनुकूल नसल्याची चर्चा आहे. त्यामुळं राज्यातील नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनियांची मनधरणी करीत असल्याचे वृत्त आहे.

16:39 (IST)11 Nov 2019
पाठिंबा दिला तर काँग्रेसनं पाच वर्ष शिवसेनेला अडथळा आणू नये -देवगौडा

माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे नेते एच.डी. देवगौडा यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसची दिल्लीत चर्चा सुरू आहे. यावर बोलताना देवगौडा म्हणाले, "जर काँग्रेसनं शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला तर तो पाच वर्षासाठी कायम ठेवावा. मध्येच अडथळा आणू नये, असं देवगौडा यांनी म्हटलं आहे.

16:06 (IST)11 Nov 2019
शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडील जबाबदारी तीन नेत्यांकडे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना छातीत दुखत असल्यानं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती असून, त्यांच्याकडे असलेली जबाबदारी एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपासून संजय राऊत हे शिवसेनेची बाजू मांडत आहे. गेल्या पंधरा दिवसात त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं, म्हणून भाजपालाही हैराण केलं होतं. त्यानंतर शिवसेना बहुमताची जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना राऊत रुग्णालायात दाखल झाले आहेत.

15:12 (IST)11 Nov 2019
महाराष्ट्रातील सहा नेत्यांशी सोनिया गांधी करणार चर्चा

राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरात चर्चा सुरू आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीची सकाळी बैठक झाली. त्या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली. आता चार वाजता काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार यांच्यासह सहा नेत्यांशी सोनिया गांधी चर्चा करणार आहेत.

15:04 (IST)11 Nov 2019
राष्ट्रवादीची पुन्हा बैठक

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भा अधिकृत प्रस्ताव दिला आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये समानसुत्री कार्यक्रमावरही चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीनं पुन्हा महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यात प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे.

14:25 (IST)11 Nov 2019
अनिल देसाई, नार्वेकर यांनी घेतली अहमद पटेल यांची भेट

राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसची चार वाजता राज्यातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक आहे. त्यापूर्वीच देसाई आणि नार्वेकर यांनी काँग्रेसचे चाणक्य असलेल्या अहमद पटेल यांची भेट घेतली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी चर्चा करण्यात आली.

14:18 (IST)11 Nov 2019
उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यातील बैठक संपली

वांद्र्याच्या 'ताज लँड्स एन्ड' हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू होती. अर्धा तास बैठक चालली. यावेळी राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यात समानसुत्री कार्यक्रमावर चर्चा झाली असून, शिवसेनेनं अधिकृतरित्या प्रस्ताव दिला असल्याचे वृत्त आहे.

13:55 (IST)11 Nov 2019
शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका अनुकूल आहे. दरम्यान, बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. समानसूत्री कार्यक्रमावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 

13:43 (IST)11 Nov 2019
उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला -अरविंद सावंत

"लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात काम करणं शक्य नाही. त्यामुळं मी आपल्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. राजीनामा पंतप्रधानांकडं पाठवला असून, यावरून तुम्ही युती आहे की नाही याचा अर्थ लावू शकता, असं अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

13:23 (IST)11 Nov 2019
अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. 

13:04 (IST)11 Nov 2019
उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला रवाना

सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेनं बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव रविवारी रात्रीपासून सुरू केली होती. त्यानंतर सकाळपासून 'मातोश्री'वर चर्चा सुरू होती. तसेच राज्यपालांना द्यायच्या पत्रावर शिवसेना आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. पवारांना भेटल्यानंतर सत्तेचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

12:38 (IST)11 Nov 2019
पर्यायी सरकार निर्माण करणं ही आमची जबाबदारी -राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादी अनुकूल असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं. मलिक म्हणाले,"आज सकाळी पक्षाची बैठक झाली. त्यात राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दिल्लीतही काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी अजून काहीही निर्णय झालेला नसल्याचं सांगितलं. राज्यातील नेत्यासोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे. पर्यायी सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे. सरकार शिवसेनेसोबत बनवणार हे खरं असलं तरी काँग्रेसचा निर्णय होईपर्यंत आम्ही काहीही भूमिका घेणार नाही," असं मलिक यांनी सांगितलं.

12:25 (IST)11 Nov 2019
राज्यातील नेत्यांसोबत चार वाजता दिल्लीत बैठक

राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याबैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, "राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काय निर्णय घ्यायचा यासंदर्भात राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल," खर्गे यांनी सांगितलं.

11:31 (IST)11 Nov 2019
राष्ट्रवादीची भूमिका फक्त नवाब मलिक मांडणार

राज्यातील सत्तास्थापनेविषयी पक्षाची भूमिका मांडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रवक्त्यांना मज्जाव केला आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असून, त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ता स्थापनेत पक्षाची जी काही भूमिका असेल ती मांडण्याचे अधिकार पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना देण्यात आले आहेत.

11:18 (IST)11 Nov 2019
वर्षा बंगल्यावर भाजपाची बैठक

सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरलेल्या भाजपानं पुन्हा बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होत आहेत. सत्ता स्थापन करण्यातून माघार घेतल्यानंतर भाजपाची पुढची रणनिती काय असेल याबद्दल बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

11:14 (IST)11 Nov 2019
काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीत बैठक सुरू

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यातून कोणता मार्ग काढायचा यावर चर्चा होणार आहे.

11:10 (IST)11 Nov 2019
संजय राऊत 'मातोश्री'वर दाखल

सरकार स्थापन करण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.

10:59 (IST)11 Nov 2019
युती ही फक्त औपचारिकता राहिली - संजय राऊत

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना राऊत म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे अरविंद सावंत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. खोटं बोलत असतील तर कशासाठी त्या वातावरणात राहावं. शिवसेनेसोबत ज्या गोष्टी ठरल्या होत्या. त्या मानण्यास तयार नाही. मग कोणती युती राहिली आहे. युती ही फक्त औपचारिकता राहिली आहे. सावंत यांच्या राजीनाम्याचा काय अर्थ काढायचा तो काढा," असं सांगत भाजपा-शिवसेना युती तुटली असल्याचं राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं.

10:19 (IST)11 Nov 2019
शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आघाडी एकत्र निर्णय घेणार -शरद पवार

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. तसे सुतोवाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी एकत्र निर्णय घेईल. पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेला कोणतीही अट घातलेली नाही, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

09:58 (IST)11 Nov 2019
अंहकाराच्या भूमिकेतून भाजपावर ही वेळ आली -संजय राऊत

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. 'भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही. याचं खापर शिवसेनेवर फोडणं चुकीचं आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कार्यवाही झाली असती, तर भाजपावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली नसती. प्रसंगी विरोधी बाकावर बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही. या अंहकाराच्या भूमिकेतून भाजपावर ही वेळ आली आहे,' असं राऊत म्हणाले.

09:25 (IST)11 Nov 2019
शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ठरणार रणनिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासह राज्यातील राजकीय स्थितीविषयी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

09:07 (IST)11 Nov 2019
भाजपाच्या कोअर कमिटीचीही आज बैठक

विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकूनही भाजपाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यापासून दूर राहावं लागलं आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची मागणी कायम ठेवली होती. मात्र, भाजपानं नकार देत थेट सत्ता स्थापन करणार नाही, असं राज्यपालांना कळवलं. त्यानंतर शिवसेनेकडून सत्तेस्थापनेसाठी सुरू झाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

08:53 (IST)11 Nov 2019
शिवसेनेची साडेनऊ वाजता महत्त्वाची बैठक

राज्यपालांकडून आमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेनं सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. 'एनडीए'तून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेची साडेनऊ वाजता बैठक होणार आहे. मालाड परिसरातील हॉटेल द रिट्रीटमध्ये ही बैठक होणार असून, उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार आहे. 

08:47 (IST)11 Nov 2019
काँग्रेसची दिल्लीत दहा वाजता बैठक

भाजपानं नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही बरीच चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर दोन्ही काँग्रेसचं अद्याप ठरलेलं नाही. दरम्यान, राज्यातील स्थितीवर निर्णय घेण्यासंदर्भात काँग्रेसची दहा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. या बैठकीला काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित असणार आहेत.