राज्यात करोना परिस्थिती बिघडत असल्यानं राज्य सरकारकडून लॉकडाउन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच लॉकडाउनसंदर्भात सूचना जाणून घेत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाउनला विरोध होताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावर वेगवेगळे मतप्रवाह असून, ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी लॉकडाउनसंदर्भात भूमिका मांडली आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असून, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यावरून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. याच मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर भाष्य केलं. पुण्यात रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी आले असताना त्यांनी परखडपणे मत मांडलं.

“प्रत्येकाने वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन केले पाहिजे. माझ्यासह सर्वांनी नियमांचं पालन केले पाहिजे. लॉकडाउन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे,” असं नाना पाटेकर म्हणाले.

सरकारनं लॉकडाउन लावण्यापूर्वी काही जबाबदारी घ्यायला पाहिजे का? या प्रश्नावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत. ते त्यांच्या परीने मदत करतच राहणार आहेत. पण आपण मी, तू सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाने १०० लोकांची नव्हे, तर एक-दोन अशा लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढं आलं पाहिजे. आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.