मागील दोन आर्थिक वर्षांत ऑनलाइन रेल्वे तिकीट काढणाऱ्या ४३.४७ कोटी प्रवाशांचा विमा काढण्याच्या बदल्यात खासगी क्षेत्रातील तीन कंपन्यांनी ३७.१४ कोटी रूपये कमावले आहेत. पण या कंपन्यांनी याच कालावधीत केवळ ४८ विमा दावे स्वीकारून यासंबंधित प्रवाशांना ४.३४ कोटी रूपयांची भरपाई दिली आहे. माहितीअधिकारातंर्गत याचा खुलासा झाला आहे. मध्य प्रदेशमधील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी ‘पीटीआय-भाषा’ या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी आयआरसीटीसीकडून ही माहिती मागितली होती.

आर्थिक वर्ष २०१६-१७ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान ई-तिकीट बुक करणाऱ्या कोट्यवधी रेल्वे प्रवाश्यांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. या कालावधीत आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनीला १२.४० कोटी रूपये, रॉयल सुंदरम जनरल इंन्शूरन्सला १२.३६ कोटी रूपये आणि श्रीराम जनरल इन्शूरन्सला १२.३८ कोटी रूपये विम्यापोटी मिळाले. या कालावधीत तिन्ही कपंन्यांकडे एकूण १५५ दावे प्राप्त झाले. यातील ४८ विमा दावे मंजूर करण्यात आले. यासंबंधित लोकांना ४.३४ कोटी रूपयांची भरपाई देण्यात आली. याच अवधीत ५५ विमा दावे बंद करण्यात आले तर ५२ इतर विमा दाव्यांवर अजूनही विचार सुरू आहे.

ऑनलाइन रेल्वे तिकिटावर विमा योजना ही एक सप्टेंबर २०१६ पासून सुरू झाली होती. त्यानंतर १० डिसेंबर २०१६ पासून ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ही योजना मोफत देण्यात आली आहे. तेव्हापासून यासाठी सरकारी खजिन्यातून पैसे दिले जात आहेत. रेल्वे सध्या ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे संबंधित कंपन्यांना ६८ पैसे विम्यापोटी देते. प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास पीडित व्यक्तीला कमाल १० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची यात तरतूद करण्यात आली आहे.