तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन खूप सोपं झालंय, पण तंत्रज्ञानावर जास्त निर्भर राहणं अनेकदा संकटातही टाकतं. असंच काहीसं इंडोनेशियामध्ये घडलं. गुगल मॅपमुळे एका तरुणाच्या लग्नाची वरात भलत्याच घरी पोहोचली आणि दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न होता होता राहिलं. विशेष म्हणजे ज्या घरात ही वरात पोहोचली तिथेही साखरपुड्याचा कार्यक्रम होता, आणि भलतीच वरात आपल्याकडे आल्याचं त्या घरातल्यांच्याही लक्षात आलं नव्हतं.

इंडोनेशियामध्ये गुगल मॅपच्या चुकीमुळे एका लग्नाची वरात दुसऱ्याच लग्नाच्या कार्यक्रमास्थळी पोहोचली. वरात आल्याचं पाहून तिथल्या मंडळीनेही न्याहारी वगैरे देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं. नातलगांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि त्यानंतर सुदैवाने नवरीकडील एका व्यक्तीला भलतीच वरात इकडे आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे पुढचा लाजिरवाणा प्रकार टळला. आता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वऱ्हाडीमंडळी सोबत घेऊन आलेले गिफ्टवगैरे परत घेऊन जाताना दिसत आहेत.

इंडोनेशियाच्या ट्रिब्यून न्यूजच्या रिपोर्टनुसार, गावात दोन ठिकाणी कार्यक्रम होता. एका ठिकाणी लग्नसोहळा तर दुसऱ्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. लग्नाच्या वरातीला मध्य जावाच्या पाकीज जिल्ह्यातील लॉसरी हेम्लेट इथे जायचं होतं, पण गुगल मॅपच्या मदतीने निघालेली ही वरात लॉसरी हेम्लेटऐवजी तिथून जवळच असलेल्या जेंगकोल हेम्लेट गावात पोहोचली. या ठिकाणी मारिया उल्फा आणि बुरहान सिद्दीकी यांचा साखरपुडा होणार होता, पण चुकून दुसरा तरुण तिथे लग्नाची वरात घेऊन पोहोचला. मारिया उल्फा हिला आणि तिच्या कुटुंबियांनाही चुकीची वरात आल्याचं लक्षात आलं नव्हतं. पण नंतर गप्पा मारताना तिच्या काकांच्या ही बाब लक्षात आली. दोन्ही गावातील फरक गुगल मॅपच्या लक्षात न आल्याने हा गोंधळ उडाला. अखेर चुकून वरात घेऊन आल्याबद्दल त्यांनी माफी मागितली, नंतर मुलीकडच्या कुटुंबियांनीच त्यांना विवाहस्थळी पोहोचवले.

दरम्यान, सोशल मीडियावरही हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.