गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पर्रिकरच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली.


शाह म्हणाले, गोव्याचे नेतृत्व मनोहर पर्रिकरच करतील हा निर्णय गोव्याच्या भाजपाच्या कोर टीमसोबत चर्चा करुन घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गोव्याच्या मंत्रीमंडळात आणि विभागांमध्ये लवकरच फेरबदलही केले जाणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बऱ्याच काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गोवा सरकारमधील भाजपासोबत सत्तेत असलेल्या सहकारी पक्षांकडून मुख्यमंत्री बदलासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे वृत्त होते. सहकारी पक्षांचे म्हणणे आहे की, पर्रिकर राज्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदली दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करायला हवी.

दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनीही काही दिवसांपूर्वी गोव्याच्या राज्यपालांना भेटून विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, काँग्रेसकडे आवश्यक संख्या बळ नसतानाही काँग्रेस चर्चेत येण्यासाठी अशी मागणी करीत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले होते.