फुटबॉलविश्वातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार आहे. एफसी बार्सिलोनाने यासंदर्भात माहिती दिली आहे. स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी क्लब सोडण्याची तयारी करत असल्याचे क्लबने सांगितले. मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यात नवीन करार होऊ शकला नाही. स्पॅनिश लीगा नियमांनुसार आर्थिक आणि संरचनात्मक अडथळे हे यामागील कारण असल्याचे क्लबने सांगितले.

“मेस्सी एफसी बार्सिलोनामध्ये राहणार नाही. तो आणि क्लबच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत आणि या गोष्टीचा दोघांना खेद आहे. एफसी बार्सिलोना संघ मेस्सीच्या योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. वैयक्तिक, व्यावसायिक जीवनासाठी आणि  भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा”, असे क्लबने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by FC Barcelona (@fcbarcelona)

 

हेही वाचा – Tokyo 2020 : मैत्रीण पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला कोसळलं रडू!

मेस्सी आणि बार्सिलोना

मेस्सी १३ वर्षांचा असल्यापासून बार्लिसलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेस्सीने बार्सिलोना वरिष्ठ संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने १७ वर्षात ३५ किताब आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने ७७८ सामन्यात एकूण ६७२ गोल केले आहेत. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने २०१७ या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. बार्सिलोनाने तेव्हा जवळपास ५ हजार ४०० कोटींचा करार केला होता.

 

मागील महिन्यात जिंकली कोपा अमेरिका स्पर्धा

मागील महिन्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेटिंनाने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद जिंकले. यासोबतच लिओनेल मेस्सीचे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. मार्काना स्टेडियममध्ये अर्जेटिना आणि ब्राझिल या दोन बलाढय़ संघांमध्ये होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी आणि नेयमार आमनेसामने येणार असल्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अर्जेंटिनाने १-० ने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद मिळवले.