पाढे म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. मात्र उत्तर प्रदेशमधील सहारनपुरमधील जनपद येथील जिल्हा सिंह इंटर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ११ वीमधील विद्यार्थी असणाऱ्या चिराग राठीला मानवी कॅलक्युलेटर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चिरागचे गणितामधील कौशल्य पाहून अनेकांनी बोट तोंडात घातली आहेत. सहारनपूरमधील चिरागला गणितामध्ये एवढा हुशार आहे की तो काही क्षणांमध्ये आकडेमोड करुन कोणत्याही प्रकारच्या गणितांची उत्तर देतो. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला एक १०० कोटींपर्यंतचे पाढे पाठ आहेत. सहारनपूरमध्ये तर चिरागला लिटील आर्यभट्ट असं म्हणतात. चिरागचे कौशल्य पाहून उप-मुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी चिरागला एक टॅबलेट आणि पुस्तकं भेट देत त्यांचं कौतुक केलं. चिरागबरोबरच त्याच्या आई-वडीलांचाही सन्मान करण्यात आला.

एका सर्व साधारण मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या चिराग आपल्या वडीलांचं स्वप्न पूर्ण करत आहे. वडील नरेंद्र यांनी आर्थिक संकटांना तोंड देत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केलं.  तर आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत चिरागही सध्या शिकत असून आपल्या गणिताच्या ज्ञानामुळे तो राज्यामध्ये हळूहळू लोकप्रिय होताना दिसत आहे. मोठं झाल्यावर मला एक वैज्ञानिक व्हायचं आहे असं चिरागला तुझं स्वप्न काय आहे असं विचारल्यावर सांगतो. लहानपणापासूनच चिरागला गणित विषयाची विशेष आवड होती. छोट्या वर्गात असतानाच गणितामध्ये चिरागचा वेग प्रचंड होता. इतर मुलं आकडेमोड करेपर्यंत चिराग शिक्षकांना उत्तर देऊन मोकळा व्हायचा.

राज्याच्या राजधानीमध्ये उप-मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर चिरागचं मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. शाळेतील कर्मचाऱ्यांबरोबरच त्याच्या तिरपडी गावातील लोकांनी मिठाई वाटून, चिरागला हारतुरे घालून त्याचं स्वागत केल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. चिरागने आमच्या लहानश्या गावाचं नाव देश पातळीपर्यंत मोठं केलं आहे. चिरागचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चिरागमुळे आमच्या गावाचं नाव सगळीकडे घेतलं जातं याचा विशेष आनंद आहे असंही अनेक गावकऱ्यांनी म्हटलं आहे.