मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून करोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता करोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पाठविले. या पत्रावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

“करोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा ; जनतेची दिशाभूल नको!”

सचिन सावंत म्हणतात, “मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसांना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती, असो! खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीस इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचे आहे.”

तसेच, “दुसरी लाट सुरू झाली तेव्हा १० फेब्रु २१ ला मुंबईत ३.१३ लाख संकलीत रुग्ण व ११४०० संकलीत मृत्यू होते. आज ६.७१ लाख संकलीत रुग्ण व १३६८७ संकलीत मृत्यू आहेत. दुसऱ्या लाटेच्या ३ महिन्यात २२८७ मृत्यू आहेत. हा दर केवळ ०.७% दर आहे जो जगात कमी आहे. दिल्लीत आठवड्याला ३००० मृत्यू होत आहेत.” अशी माहितीही सावंत यांनी दिली आहे.

याचबरोबर “करोना व्यतिरिक्त मृत्यू करोना मृत्यूशी जोडले तरी हा दर ०.८% फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. अस्लम शेख व वर्षा गायकवाड ही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मेहनत घेत आहेत. भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे.” असा टोला सचिन सावंत यांनी फडणवीसांना लगावल्याचे दिसत आहे.