भक्तीचा जागर, भक्तांचा सागर, अवतरला सकल देहूनगरीत…! जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमली आहे. पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्त यांच्या हस्ते पहाटे साडेचारच्या सुमारास श्रींची महापूजा आणि शिळामंदिरातील महापूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तापोनिधी नारायणमहाराज समाधीची महापुजा करण्यात आली आहे.

दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात झाली, पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते या पालखीची महापूजा झाली. दुपारी चारच्या सुमारास मंदिरातून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरवर्षीप्रमाणे पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या १०० जणांच्या पथकाने देहू नगरीत स्वच्छतेचे संदेश देत वारकऱ्यांनी जेवणासाठी वापरलेल्या पत्रावळ्या आणि कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावताना दिसत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर विद्यर्थिनींचा सहभाग आहे.

लाखो वारकरी देहू नगरीत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ७ पोलिस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपपोलिस निरीक्षक आहेत. जवळपास ३०० पोलीस कर्मचारी, ७० ते ७५ महिला पोलीस कर्मचारी, ७० वाहतूक पोलीस तैनात आहेत. तर, श्वानपथक आणि बॉम्बनाशक पथक देखील आहे. २०० च्या आसपास पोलीस मित्र देखील आहेत. एसआरपीच्या ५० जवानांच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. देहू मंदिर ट्रस्ट यांच्याकडून मंदिर परिसरात ऐकून २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच देहू पोलीसांकडून १२ सीसीटीव्हीने हालचालींवर नजर राहणार आहे. तर दुर्बिणीद्वारे देखील बारीक हालचालींवर पोलिसांचे लक्ष असणार आहे.

गेल्या २५ वर्षांपासून वारकऱ्यांना मोफत जेवण देण्याचं काम नवश्या गणेश मंडळ करत आहे. नवश्या गणपती मित्र मंडळ यांच्याकडून गेल्या २५ वर्षापासून अविरतपणे वारकऱ्यांना अन्नदान करत आहेत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे अन्नदान सुरू असत. यावर्षी प्लास्टिक बंदी असल्याने या मंडळाने थर्माकोल ताटांचा वापर न करता पत्रावळ्याचा वापर केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी या अन्नदानाचा लाभ घेतात. मसालेभात, शिरा आणि एक भाजी अस जेवणामध्ये समावेश असतो. हे सर्व मंडळातील सदस्य स्वखर्चाने करतात.

काही संशयित पाकिटमार पोलिसांच्या ताब्यात
पालखी सोहळ्यात पैसे, दागिने, मोबाईल फोनवर हात साफ करणाऱ्या ३ महिला, ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालखी सोहळ्यात चोरीच्या अनेक घटना घडतात त्यामुळे वारकऱ्यांना संशयित आढळल्यास त्यांनी पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहेत.