उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची दीड-दोनची वेळ. नुकतीच जेवणं झाली होती. चौसोप्यातल्या कडीपाटावर मासिक चाळत पडले होते. माझी ही खूपच जुनी सवय आहे. आजही इतक्या वर्षांनी सासरहून आलेली मी माहेरवाशीण, पण हा जुना चौसोपीवाडा, तोच कडीपाट.. सारं कसं माझ्या बालपणातलं.. माझं बालपणच मी त्रयस्थपणे आठवीत होते.

हा कडीपाट माझा अतिशय आवडीचा. सगळ्या मत्रिणींना गोळा करून मी कडीपाटावर खेळायचे. खरं तर आजी सांगते हा कडीपाट फक्त आजोबांचाच. तिथं बसून ते गावाचे प्रश्न सोडवायचे. आजोबांचा एवढा दरारा की ते कडीपाटावरून उठून गेले की त्या कडीपाटावर साधी चिमणीसुद्धा बसत नव्हती म्हणे. पण आजोबांच्या माझ्यावर मात्र भारी जीव. आजी सांगते मला घेऊन आजोबा कडीपाटावर झोका घ्यायचे. झोपवायचे. मी जर आऽची तान धरली तर ना, आजोबा चक्क गायचेसुद्धा. मग सर्वजण तोंडाला पदर लावून हसायचे. पण मोठय़ाने हसायची कोणाची बिशाद.

मी पाच-सहा वर्षांची असेन, आजोबा आठ-दहा दिवसांसाठी तालुक्याच्या गावाला गेले हेते. त्यांच्या आठवणीनं कडीपाटावर रडत बसले आणि इतक्यात थोरली आजी म्हणाली, ‘खालच्या अंगणातल्या िलबावर केव्हाचा कावळा ओरडतोय, हरणी तुझे आजोबा आज नक्की येणार हं. रडू नकोस. तो बघ कावळा आणखी ओरडला,’ असं म्हणतच आजीनं मला बळेबळेच कडेवर घेतलं आणि खाली अंगणात आणलं. त्या कावळ्याकडे बोट दाखवीत म्हणाली, ‘काव काव कावळ्या, आमच्या हरणीचे आजोबा येणार असतील तर भुर्रकन उडून जा’ आणि आजी असं म्हणेपर्यंत कावळा उडूनही गेला. कावळा उडून जायला आणि खालच्या अंगणात आजोबांची घोडागाडी यायला एकच गाठ पडली. झालं, माझ्या बालमनावर पक्क ठसलं की, कावळा ओरडला की आजोबा येणार. कावळा ओरडला की कोणी पाहुणे येणार.

त्यानंतर माझा हा छंदच झाला. कावळा झाडावर येऊन बसला रे बसला की सुरूच ‘काव काव कावळ्या.. आमच्याकडे कुणी पाहुणे येणार असतील तर उडून जा. तू उडून गेलास की तुझा सांगावा मिळाला म्हणून समजू काव काव कावळ्या उडून जा.’ मग बरोबरीच्या मत्रिणीही कोरस करायच्या. आमच्या दंग्यांनी कावळा उडून जायचा, पण त्या दिवशी कुणीही यायचं नाही. मग आम्ही सगळ्या जणी ओशाळून जायचो नाराज व्हायचो. तेव्हा आजी म्हणायची, ‘अगं वेडाबाई तो कावळा डोमकावळा होता वाटतं, म्हणूनच कोणी आलं नाही.’ ‘पण आजी सगळे कावळे तर सारखेच दिसतात ना. काळे काळेकुट्ट. आजी म्हणायची होय, दिसायला सगळेच सारखे असतात. पण कावळा ओरडूनही कुणी आलं नाही ना की समजायचं की तो डोमकावळा होता. त्याचं काही खरं येत नाही. त्या वेळी हीदेखील मला समजविण्याचीच पद्धत असायची खरं तर, पण तरीही एवढय़ावरही माझ्या बालमनाला खूप काही समजल्याच्या ऐटीत मान डोलवायची आणि त्यानंतर कावळा ओरडूनही कोणी आलं नाही की उदास व्हायची नाही.

बालमनाचे ते दिवस कसे मजेत जायचे. कोणाबरोबर शेतात जा, तिथं कच्ची, कोवळी कोवळी मक्याची दुधी कणसं खा, कुठं सर्वाबरोबर कोवळी वांगी खा किंवा गव्हाच्या लोंब्या खुडून त्यातला गव्हाचा रवा आणि त्यातलं दूध चाखायचं आणि चोथा टाकायचं. कशाचा म्हणून विधी-निषेध नसायचाच. इतर कसे वागतात तेच अनुसरायची. एकदा काय झालं. शेताशेजारीच एक मोठा डोह आहे. गुरं राखायला येणाऱ्या मुली आपल्या परकराचा फुगा करून पोहायच्या आणि मी कडेला बसून बघायची. तेही घरी कोणाला डोहावर आलेलं न कळेल या तरतुदीनं. अर्थात सखू बरोबर असायचीच. पण तिचं माझ्यापुढं काही चालायच नाही. त्या मुलींचं पोहणं बघायला मला आवडायचं त्यांचा पोहण्यातला आनंद मला मोहायचा. वाटायचं आपण कधी मोठे होवू आणि असं पोहायला शिकू. घरी आलं की कसं कोणजाणे माझ्यासंबंधी सगळी हकीकत समजलेली असायची आणि थोडा राग अधिक प्रेम अशा काही कडूगोड दटावणीत आजोबा समजवायचे, ‘‘हरणी आज कुठं भटकायला गेली होतीस? परत एकदा सांगून ठेवतो, परत असं गुरासारखी भटकलीस तर हाड ठेचून ठेवीन.’’ असे रागवतच ते नरम व्हायचे, शांत व्हायचे. खरं तर माझ्यावर त्यांना रागावताच यायचं नाही. मग म्हणायचे, ‘‘इनामदारांच्या पोरीनं असं िहडायचं नसतं हरणी. तू कसं झोकात राहिलं पाहिजे.’’ मला मात्र यातलं काहीही मेंदूपर्यंत पोहोचायचं नाही. पण भीतीपोटी हूं हूं म्हणायची. पुन्हा आपलं बे एके बे सुरूच. मला कधीच चार िभतींत मोठेपणाच्या दबावात राहायला आवडायचं नाही. खरं तर मोठेपण म्हणजे काय तेही कळत नव्हतं, हा बाकी आपल्यावरच सर्वाची माया असावी आणि सर्वानी आपलच ऐकावं असं वाटायचं खरं अर्थात प्रत्येकालाच त्या वयात असं वाटतं.

पण पिकाने भरलेला तो मळा, तो संथ पाण्याचा डोह, त्यातली छोटी छोटी मासळी तर कशी सळकन पळायची. हरिबा वैरण कातरताना होणारा कर्र कर्र असा आवाज वैरण खाताना गोठय़ातल्या जनावरांची ती हालचाल. बलांच्या गळयातील ती चाळ मला स्वस्थ बसूच देत नसे आणि सगळ्यांची नजर चुकवून मी सटकायची या साऱ्यात आणि बरोबरीच्या पोरींना घेऊन भातुकली खेळण्यात आजोबांच्या कुटलेल्या सुपारीचा तोबरा भरण्यात दिवस कसा उजडायचा आणि कधी मावळायचा काहीच कळत नसे.

आणि अचानक एके दिवसी आजोबा बाहेरून ओरडतच आले. ‘‘हरणी कुठे आहे. हरणीला बाहेर पाठवू नका. पोरींना घेऊन येथेच खेळू दे तिला. तिच्याबरोबर रायबाला ठेवा नाही तर पोर घाबरेल.. अहो, ऐकलं का! (हे आजीला उद्देशून) अहो ऐकलं ना! तुम्ही सगळे बाहेरच्या वाडय़ात चला. व्हंजीचं सगळं आटोपलं.’’ सर्वाना काय समजायचं ते समजलं. मी तेवढी अज्ञानात राहिले. सगळे जण बाहेरच्या वाडय़ात गेली. रायबा आम्हा मुलांना खेळवत गोष्टी सांगत बसला. किती वेळ झाला तरी कोणी परत आलं नाही. मला तर भूक लागलेली. घरात कोणीच नव्हतं. आजोबांशिवाय तर मी जेवायची नाही आणि हे माहिती असूनही आजोबा अजून आले नाहीत म्हणून मी तडक उठलेच. रायबाच्या अडवण्याला न जुमानता थेट बाहेरच्या वाडय़ाकडे गेले, तर तिथे तोबा गर्दी. मला काहीच कळेना. सगळे जण रडत होते. नेहमी ताठ मानेने राहणाऱ्या आजोबांनीही खाली मान घातलेली. नाही म्हणायला व्हंजी आजी तेवढी त्यात दिसत नव्हती. घाबरलेच मी. काहीच कळेना. मागोमाग रायबा मला न्यायला आलाच होता. त्याला चुकवून मी आजीजवळ गेले मी आजीला विचारलं, ‘‘आजी आजी तुम्ही सगळे का रडताय?’’ पहिल्यांदा कुणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. जवळ घ्यायचे आणि गप्प बसायचे. पण माझं आपलं तेच पालुपद, ‘‘तुम्ही का रडताय? आजी सगळे जण का रडताहात? सांग ना मला का रडता सगळे.’’ शेवटी कुणीस सांगितलं, ‘‘व्हंजी आजी सर्वाना सोडून दूर गावाला गेली ना म्हणून रडतात सगळे.’’ एवढय़ावर गप्प बसेल ती हरणी कसची. पलीकडच्या िलबाच्या झाडावरच्या कावळ्याला बघून मी म्हटलं, ‘‘तो पाहा कावळा ओरडतोय ना. त्याला विचारते हे मी. काव काव कावळ्या व्हंजी आजी केव्हा परत येणार? आज येणार असेल तर उडून जा.’’ तसल्या दु:खातही सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक किंचितशी स्मितरेषा दिसली. पण त्यांचं ते हसणं मला एरंडेल प्यालेल्या माणसासारखंच वाटलं. तेव्हाही कावळा उडून गेला पण आजपर्यंत व्हंजी आजी परत आली नाही.

पसरलेलं मोकळं आकाश बघायला मला तेव्हाही आवडायचं. दिवस मावळायला वेगवेगळे पक्षी कसे थव्याथव्याने जायचे. वाटायचं आपल्यालाही पंख असते तर, पण एवढय़ा साऱ्या पक्ष्यांमध्ये कावळ्यांचे थवे काव काव करत चालले की आनंदाने आम्ही नाचायचो. टाळ्या पिटायचो आणि म्हणत असू, ‘‘कावळ्यांची शाळा सुटली, कावळ्याची शाळा सुटली.’’ त्या वयात कावळ्यांचीही शाळा असावी असं वाटायचं. आणि त्या थव्यातून आमच्या बालदृष्टीला जो कावळा मोठा दिसायचा तो त्यांचा मास्तर म्हणून रेखाटायचो. हे सगळं आठवलं की मन कसं आजही सुखावतं क्षणभर.

पुढे आम्हा भावडांना शाळेसाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ठेवलं. तेव्हा मी इयत्ता दुसरीत होते. त्या वेळी आमच्या वर्गात पन्नास मुलामुलींचा पट होता. एवढय़ा मोठय़ा वर्गात सर्वात हुशार म्हणाल तर एकटे मास्तरच तेवढे डोकेबाज होते. त्यानंतर गुरुजींच्या मते माझा नंबर असायचा. कारण गावाकडून भाजीपाला, दूध, आंब्याच्या मौसमात आंबे मास्तरांच्या घरी परस्परच पोहोच व्हायचे. मग काय गुरुजी बिनातक्रार खूश असायचे माझ्यावर. आजोबांच्या समोर कधीमधी शाबासकीही द्यायचे. त्यामुळे आजोबाही खूश आणि भरलेल्या वर्गात आपल्या पाठीवर गुरुजींनी शाबासकी दिल्याबद्दल आम्हीही खूश.

असेच एकदा आम्ही सुट्टीत गावाकडे आलो. लोडणा काढलेली गाय कशी उंडारते तसाच आम्ही दंगा घातला. आमच्या भटकंतीला आळा म्हणून आजोबांनी गोष्टी सांगण्याची योजना आखली. त्यांनी सुरू केलं, ‘‘ एक होता कावळा, एक होती चिमणी, चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. एकदा काय झालं..’’ ‘‘आजोबा ही गोष्ट आम्हाला अगदी तोंडपाठ झालीय. आणि ही गोष्ट ऐकण्याइतके काय आम्ही छोटे राहिलोत?’’ पण आमचं कोण ऐकतंय आजोबाच म्हणाले, ‘‘नाही ते काही नाही चालायचं. हीच गोष्ट ऐकायची.’ खरं तर त्यांना दुसऱ्या गोष्टी येतच नव्हत्या. आम्ही मुकाटय़ानं चिऊ-काऊची गोष्ट ऐकत बसलो. पण एक मात्र लक्षात आलं की, आजोबांचं घरटंही चिऊच्या मेणासारखं घट्ट होतं. कितीही पाऊस पडला तरी गळणार नव्हतं, ढासळणारं नव्हतं.

पण खरं सांगू मला जेव्हा बेबी झाली आणि पुढे गोष्ट सांगण्याची वेळ पडली तेव्हा माझ्याही नकळत मीही हीच चिऊकाऊची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.

चिमणीच्या लग्नाच्या वेळची एक गोष्ट सांगते. ही चिमी म्हणजे आमच्याकडे लहानाची मोठी झालेली दूरच्या नात्यातली एक अनाथ पोर. आजोबांनी तिचं शिक्षण वगरे केलं. तिचं लग्नही आजोबांनीच करायचं ठरवलं होतं. खूप पाहुणे जमले होते. आमची कोकणातली आत्याही आली होती. या आत्याला एक अफलातून बाळ होतं. त्याचं नावच बाळ होतं. अतिशय वांड आणि अवखळ करट.  बिचाऱ्या चिमीनं आधीच कोपरा धरला होता लाजून आणि हे धांदरट तिला शिवतच होतं. तशी आजी एकदम खेकसली. अरे अरे, शिवशील की तिला, नाही तर ती कपडे काढून घेईल बघ तुझे. बाळाला मोठा अचंबाच वाटला. मगाशी तर चिमीनंच त्याला लाडू खायला दिला होता आणि आता हा काय प्रकार. साहजिकच त्यानं विचारलं का शिवायचं नाही? आत्या ओरडली ‘फाटे फोडायची भारी खोड लागलीय काटर्य़ाला. का शिवायचं नाही म्हणजे? तिला कावळा शिवला ना, म्हणून शिवायचं नाही. जा पळ आता.’ आणि दोस्तांच्यासाठी जेवढे म्हणून खिशात हातात मावतील तेवढे लाडू घेऊन स्वारी एकदाची कटली. दंगामस्ती करत पोरं लिंबाखाली लाडू खात बसली होती. बाळच्या हातात अजून दोन-तीन लाडू होते आणि कसं लक्ष गेलं कोण जाणे, कावळय़ाने बाळच्या हातावरच झडप घेतली. झालं, लाडू तिथंच टाकले बेटय़ानं आणि अस्मादिक तडक वाडय़ात ओरडतच आला. ‘आई, आई ए आई कावळ्यानं शिवलन माका,’ आता या बाळ्याला काय म्हणायचं!

हा कावळा, पाहिलं तर वितभरं लांब आणि हुसकावला तर उडून जाणारा. पण काय काय करायला लावतो. काय काय हसं करतो ते सांगायलाच नको. माझी एक मत्रीण आहे. शुभशकुनावर तिचा जिवापाड विश्वास. आडवं मांजर गेलं की थांबेल, पाच पावलं मागे सरकेल. पापणी फडफडली सोनं लावेल त्यात आणि डावी फडफडली की उजवी यावर विचार करेल. पाल चुकचुकली, का चुकचुकली कोणत्या दिशेला चुकचुकली एक ना दोन! एखाद्या गोष्टीवर फारच एक्साइट होते. तिचे यजमान मिलिटरीत कर्नलच्या हुद्यावर आहेत. आधीच आणीबाणीचा प्रसंग, शेजारच्या शत्रुराष्ट्रांची हालचाल काही वेगळीच वाटत होती. वातावरण एकंदर तंग होतं. प्रत्येकानं सावधगिरी राखावी असा सर्वाना हुकूम होता. त्यांना जाणारी-येणारी पत्रं सेन्सॉर होऊन तपासून दिली जात होती.  कर्नलना त्यांच्या घरच्यांकडून, स्नेहय़ांकडून पत्रं जायची. सवडीनुसार कर्नलसाहेबही पत्रं पाठवायचे. एकदा अशीच एक तार टेलिग्राम कर्नलसाहेबांच्या हाती पडली. ‘मिसेस िशदे एक्स्पायर्ड.’

एवढा मोठा कर्नल निधडा, शत्रूलाही पाणी पाजवणारा. पण तारेतला मजकूर वाचून त्यांचे हातपायच गेले. देशाची परिस्थिती तर इतकी गंभीर होती की रजा मिळवणं सोडाच, पण मागणंही शक्य नव्हतं. त्यात जबाबदारीचा हुद्दा आणि प्रसंग तर असा बाका. बायकोच्या निधनानं कर्नलसाहेबही हादरले. अंत्यविधीला जायला मिळणार नाही, याचंही त्यांना वाईट वाटायला लागलं.

हा हा म्हणता साऱ्या कॅम्पमध्ये बातमी पसरली की, मिसेस िशदे गेल्या, मग काय? कोणी फोनवरून तर कोणी प्रत्यक्ष कर्नल िशदेंना भेटून दुख व्यक्त करू लागले. तेवढय़ात आणखी एक तार आली. कर्नलसाहेबांना काही ही तार घ्यावी व फोडून वाचावंसं वाटेना. तरीही त्यांनी थरथरत्या हातांनीच दुसरी तार फोडली तर आत मजकूर होता, ‘यापूर्वी जी तार केली होती ती मला कावळा शिवला म्हणून. तुमची सौ. प्रेमा.’ कर्नलांनी तर डोक्यालाच हात लावला. पण दुसरे ऑफिसर्सही हसायला लागले. ‘‘ ये भी क्या बात है भाई हम डिफेन्सके लोगोंको इस तरह के शुभअशुभ संदेहपर ध्यान नही देना चाहिए’’ मग काय कर्नलसाहेबांनी बायकोला फोनवर असं घेतलं की, बिचारीला वाटलं खरंच मेली असते तर बरं झालं असतं.

असा हा कावळा आणि आपले हे समज. झोपाळ्यावर पडल्या पडल्या भूतकाळातल्या साऱ्या घटना कशा चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून सरकत होत्या. मी माझ्या विचारात दंग होते आणि अचानक बेबीच्या मामीच्या आवाजाने भानावर आले. मामी बेबीला घेऊन म्हणत होती…

‘‘काव काव कावळ्या..’’ आमच्या बेबीचे पप्पा येणार असतील, तर उडून जा. काव काव कावळ्या आमच्या शोणीचे पप्पा येणार असतील तर उडून जा.’ िलबावरचा तो कावळा आज्ञाधारकपणे उडून गेलाही आणि या वयातही मला गुदगुदल्या झाल्या. कारण बेबीचे पप्पा येणारच होते, तेही माझ्यासाठी. पण हे मात्र बेबीला माहीत नव्हतं आणि तिच्या मामीलाही.
डॉ. सुवर्णलता जाधवराव – response.lokprabha@expressindia.com