मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते भिडल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अयोध्येतील जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरुन शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरुन भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं असता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे अशा शब्दांत उत्तर दिलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

“कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून काम मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते

“होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना भवनाबाहेर नेमकं काय घडलं –

अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या भूमिके मुळे संतापलेल्या ‘भाजयुमो’ने मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली दादरमधील शिवसेना भवनवर ‘फटकार मोर्चा’ काढला होता. शिवसेना भवनवर मोर्चा येणार, हे समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासहअनेक महिला शिवसैनिकही हजर होत्या. या आंदोलनातून काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगत ‘भाजयुमो’चा मोर्चा शिवसेना भवनपासून काही अंतरावरच अडवला. ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी मोर्चा पुढे नेऊ द्यावा, असा प्रयत्न के ला. काही जणांनी रस्त्यावर ठाण मांडत घोषणाबाजी सुरू के ली, तसेच ‘सोनिया सेना’ असे फलकही झळकवले.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

‘भाजयुमो’च्या आंदोलकांना अटक करून पोलीस गाड्यांमधून नेत असतानाच्या गडबडीत काही मोर्चेकरी पोलिसांचे अडथळे झुगारून शिवसेना भवनच्या दिशेने आल्याचे वृत्त पसरले आणि शिवसैनिक त्या दिशेने धावले. त्यावेळी ‘भाजयुमो’चे मोर्चेकरी आणि शिवसैनिकांत हाणामारी झाली. यात अनेक मोर्चेकऱ्यांना दुखापत झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मागे सारल्याने मोठा अनर्थ टळला. शिवसैनिकांनी मोर्चेकऱ्यांवर हल्ला के ल्याचा आरोप आंदोलक करत होते. ‘‘शांतपणे मोर्चा व आंदोलन सुरू होते व पोलीस आम्हाला अटक करून नेत होते. पण शिवसैनिकांनी मोर्चामधील महिलांवर व माझ्यावर हल्ला के ला. माझ्या पोटावर लाथा मारल्या’’ असा आरोप ‘भाजयुमो’च्या अक्षता तेंडुलकर यांनी के ला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महिलांवर हल्ला करण्यासाठी शिवसैनिक पाठवले हे लज्जास्पद आहे, अशी टीकाही तेंडुलकर यांनी के ली. नंतर तेंडुलकर यांनी माहीम पोलीस ठाण्यात श्रद्धा जाधव व इतर शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल के ली.

श्रद्धा जाधव यांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. आम्ही शिवसेना भवनच्या रक्षणासाठी जमलो होतो. आम्ही कोणावरही हल्ला केलेला नाही. अक्षता तेंडुलकर यांच्यावर हल्ला करायला कोणी गेले नव्हते. त्या आंदोलन करत खाली बसल्या होत्या. उलट त्याच नंतर उठून आरडाओरड करत होत्या. मी किं वा कोणत्याही शिवसैनिकाने तेंडुलकर यांना मारहाण के लेली नाही, असे श्रद्धा जाधव यांनी सांगितले. तसेच राज्यातील सत्ता गेल्याने पाण्याबाहेरील माशाप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते तडफडत आहेत. सरकार पडत नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे व त्यातूनच त्यांना हा सारा बनाव केल्याचा आरोप जाधव यांनी केला.