चप्पल आणि बुटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बाटा’ कंपनीचे नेतृत्व प्रथमच एका भारतीय व्यक्तीच्या हाती आले आहे. संदीप कटारिया यांची बाटाच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी निवड करण्यात आली आहे. ते बाटा इंडियाचे CEO होते. त्यांना बढती देऊन कंपनीच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी निवड करण्यात आली आहे. बाटाच्या १२६ वर्षांच्या इतिहासात संदीप कटारिया यांच्या रुपाने प्रथमच एक भारतीय व्यक्तीची या पदावर निवड झाली आहे. संदीप कटारिया एलेक्सिस नसार्ड यांची जागा घेणार आहेत.

संदीप कटारिया यांनी सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. जगातील काही प्रमुख कंपन्यांची धुरा भारतीय वशांच्या व्यक्तीच्या हाती आहे. सत्या नाडेला हे प्रसिद्ध संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत तर सुंदर पिचाई अल्फाबेटचे सीईओ आहेत.

एलेक्सिस नसार्ड पायउतार होत असून संदीप कटारिया तात्काळ प्रभावाने त्यांची जागा घेणार आहेत. नसार्ड पाचवर्ष बाटाचे आंतरराष्ट्रीय सीईओ होते. IIT दिल्लीमधून इंजिनिअरींग करणारे संदीप कटारिया XLRI चे १९९३ PGDBM बँचचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्याकडे युनिलिव्हर, यम ब्रॅण्डस आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांमध्ये २४ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.

२०१७ मध्ये संदीप कटारिया बाटा इंडियामध्ये CEO म्हणून रुजू झाले होते. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बाटासाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. कटरिया यांच्या नेतृत्वाखाली बाटा इंडियाने दुप्पट नफा कमावला. बाटाने प्रामुख्याने तरुण ग्राहकांवर आपले लक्ष केंद्रीत केले. २०१९-२० मध्ये बाटा इंडियाचा महसूल ३,०५३ कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट ३२७ कोटी रुपये होते.