फलंदाजांचा कर्दनकाळ आणि श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे. तर इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी २० मालिकेत दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा संघ पराभूत झाला, त्यानंतर त्याने ही घोषणा केली.

विश्वचषकानंतर माझी कारकिर्द संपणार आहे. मला टी २० विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे मी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर त्या प्रकारातून निवृत्त होत आहे, तर टी २० विश्वचषकानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असे मलिंगा म्हणाला. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० सामन्यात रिधा हेंड्रीक्सला बाद करून मलिंगाने टी २० मधील आपला ९७ वा बळी टिपला. या प्रकारात सर्वाधिक ९८ गडी टिपण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी मलिंगाला केवळ एकच गडी बाद करण्याची गरज आहे.

दरम्यान, मलिंगा सध्या पुन्हा एकदा IPL 2019 मध्ये दिसणार आहे. पण IPL च्या पहिल्या ६ सामन्यांना तो मुकणार आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सशी आहे. पण त्या आधी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. श्रीलंकेचा कर्णधार म्हणून त्याला मायदेशी परतावे लागणार आहे. कारण आगामी विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीने त्याला त्या एकदिवसीय स्पर्धेत खेळण्यास सक्ती केली आहे. गेल्या वर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये होता, मात्र यंदा लिलावात मुंबईने त्याला गोलंदाज म्हणून २ कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले आहे.