नागपूरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इफ्तार पार्टीला परवानगी नाकारल्यावरुन निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रीय मुस्लिम मंचने स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली संघटना आहे. इस्लाम दुसऱ्या कोणालाही मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टी ठेवायला सांगत नाही. त्यामुळे राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या महाराष्ट्र युनिटच्या नेत्याने आरएसएसला केलेल्या विनंतीमध्ये उणीवा आहेत असे मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अफझल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

मागच्या आठवडयात राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या महाराष्ट्र संयोजक मोहम्मद फारुख शेख यांनी आरएसएसचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्याकडे स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. आरएसएसने स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टी होऊ शकत नाही असे स्पष्ट केल्यानंतर हा सर्व वाद उत्पन्न झाला.

आज संपूर्ण जगामध्ये भारतात असहिष्णूता वाढत चालल्याची चर्चा सुरु आहे. आरएसएसने इफ्तार पार्टी आयोजित केली तर बंधुभावाचा संदेश जाईल असे मला वाटले होते. इफ्तार पार्टी आयोजित करण्यात चूक काय? असा सवाल मोहम्मद फारुख शेख यांनी केला. मागच्यावर्षी आम्ही मोमीनपूरा जामा मिशिदीच्या समोर इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्यामध्ये भाजपा आणि आरएसएसचे नेते सहभागी झाले होते असे शेख म्हणाले.

आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले कि, सध्या स्मृती मंदिरात असा कुठलाही कार्यक्रम होऊ शकत नाही कारण तिथे तिसऱ्या वर्षाचा प्रशिक्षण वर्ग सुरु आहे. आरएसएसने परवानगी नाकारल्यामुळे मोहम्मह शेख यांनी नाराजीचा सूर लावला आहे. त्यांनी शाकाहारी पार्टी आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.